इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमात आता ‘हडप्पा संस्कृती‘ची ओळख ‘सरस्वती संस्कृती’ म्हणून करून देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात हा बदल करण्यात आला आहे.

आयोगाने इतिहासाचा पदवी अभ्यासक्रमाचा आराखडा नुकताच जाहीर केला. देशभर अभ्यासक्रमात किमान पातळीवर समानता असावी यासाठी आयोगाने जाहीर केलेल्या आराखड्यानुसारच विद्यापीठे अभ्यासक्रम निश्चित करतात. गेली अनेक वर्षे इतिहासात शिकवण्यात आलेल्या ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सरस्वती संस्कृती’ म्हणून या आराखड्यात करण्यात आला आहे. त्याचबरोबर वैदिक संस्कृतीच्या समावेशाची सूचनाही करण्यात आली आहे. या मसुद्यात ‘सरस्वती संस्कृती’, वैदिक संस्कृती शिकवण्याची सूचना आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही नागरीकरणाचे दाखले इतिहासात उपलब्ध नाहीत, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.

‘प्राचीन भारताचा इतिहास आणि परंपरा याच विचार करताना फक्त वैदिक साहित्याचा विचार हा संकुचित विचार आहे. अधार्मिक ऐतिहासिक घटकांचा या आराखड्यात समावेश नाही. वेगवेगळ्या संस्कृती भारतात होत्या. मात्र आर्य संस्कृतीकेंद्री असे या आराखड्याचे स्वरूप दिसते, अशी टीकाही एका शिक्षकांनी केली.

प्राध्यापक म्हणतात…

सरस्वती संस्कृती असे म्हणणे हे ऐतिहासिक संदर्भांनुसार चुकीचे आहे. हा संदर्भ वैदिक साहित्यात आला आहे. पूर्व वैदिक साहित्यातील सरस्वती संस्कृतीच्या संदर्भाचा हडप्पा संस्कृतीशी संबंध नाही. हडप्पा संस्कृतीच्या नागरी परंपरांचा ºहास त्यापूर्वीच हजारो वर्षे झाल्याचे पुरावे आहेत. संस्कृती नष्ट होणे म्हणजे एक नागरी परंपरा नष्ट होणे, असे मत मुंबई विद्यापीठातील एका प्राध्यापकांनी व्यक्त केले.