मेट्रो २ बी आणि मेट्रो ४ मार्गिकेतील एकत्रित थांब्यामध्ये एमएमआरडीएने महत्त्वाचा बदल केला आहे. मेट्रो २ बी मार्गावरील पूर्व द्रुतगती मार्ग हे स्थानक आणि मेट्रो ४ वरील सिद्धार्थ कॉलनी हे स्थानक एकत्र करण्यात आले आहे. मेट्रो २ बी मार्गिका ही डीएन नगर ते मानखुर्द अशी असून मेट्रो ४ मार्गिका ही वडाळा ते कासारवडवली अशी आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त ए.आर. राजीव यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, ‘‘प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी या दोन मार्गिकांवर स्थानक बदलण्यासाठी दोन्ही मार्गिकांवर सिद्धार्थ कॉलनी हा एकच थांबा यापुढे देण्यात आला. मूळ योजनेनुसार मेट्रो २ बी मार्गावर पूर्व द्रुतगती मार्ग हे स्थानक आणि मेट्रो ४ वरील सिद्धार्थ कॉलनी ही स्थानके मार्गिका बदलण्यासाठी ठरवली होती. त्या दोहोंमध्ये ४८० मीटरचे अंतर होते; पण प्रवाशांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.’’  मेट्रो २ बी ही मार्गिका मेट्रो २ ए या दहिसर ते डीएन नगर मार्गिकेचा विस्तार आहे. दोन्ही मार्गिका मिळून १२ लाख प्रवाशांना सेवा पुरवणार आहे, तर मेट्रो ४ मार्गिका दिवसाला आठ लाख प्रवाशांना सेवा पुरवेल.