अक्षय मांडवकर

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला अडथळा ठरण्याची भीती

राज्य सरकारने हाती घेतलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे एमएमआरडीएकडून बांधण्यात येणाऱ्या वरळी-शिवडी जोडपुलाच्या मार्गिकेत काही प्रमाणात बदल होणार आहेत. वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि सध्या बांधकामाला सुरुवात झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (शिवडी-न्हावा शेवा) जोडण्याचे काम हा पूल करणार आहे. या प्रस्तावित पुलाची मार्गिका शिवडी येथील बीडीडी चाळींना छेदून जात आहे. त्यामुळे या मार्गिकेत बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या दोन्ही प्रकल्पांना जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून ४.५ किमी लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. सुमारे ३२ मीटर उंच असणाऱ्या या पुलाचा निर्मिती खर्च साधारण १,५०० कोटी रुपये असून तो २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एमएमआरडीएसह मुंबई महापालिका आणि अन्य प्रशासकीय यंत्रणाही या नियोजनात सहभागी आहेत. हा पूल मोनो मार्गिका, हिंदमाता पूल, प्रभादेवी रेल्वे स्थानक यांवरून जाणार आहे. तसेच वरळी, परळ, शिवडी या भागांतील नागरी वसाहतींमधूनही प्रकल्पाचा मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे या वसाहतींतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यातच शिवडी येथील एका बीडीडी चाळीलाही या पुलाच्या मार्गिकेचा फटका बसेल. त्यामुळे या मार्गिकेत बदल करण्याचे प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. म्हाडाच्या वतीने या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. शिवडी येथील १२ बीडीडी चाळींच्या जागेची मालकी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडे आहे. पोर्ट प्रशासनाकडून जागा हस्तांतर झाल्यानंतर या चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात केली जाईल. अशात वरळी-शिवडी जोडपुलाची मार्गिका या परिसरातून प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गिकेची निश्चिती अंतिम टप्प्यात असली तरी, मार्गिकेआड येणाऱ्या चाळीला वगळण्याच्या हालचाली सुरू आहेत.

अभियांत्रिकी विभागाने तयार केलेल्या वरळी-शिवडी जोडपुलाची मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. आता त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होणार नाहीत. मात्र शिवडीतील बीडीडी चाळींमुळे पुलाच्या मार्गिकेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

– आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए