राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभिायांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

देशभरातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बुधवारपासून पुढील (२५ मार्च) २१ दिवस म्हणजे एप्रिलच्या साधारण दुसऱ्या आठवडय़ापर्यंत बंद ठेवण्याच्या घोषणेनंतर राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी पुढे ढकलली आहे. राज्यात १३ ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परीक्षेचे तपशील कक्षाकडून काही दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर करण्यात येणार आहेत. कक्षातर्फे घेण्यात येणारी एमसीए अभ्यासक्रमाची २७ मार्चरोजी नियोजित असलेली प्रवेश परीक्षा आता ३० एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा कक्षानेही ५ ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलली आहे.

राज्यातील प्रवेश परीक्षांबाबतची माहिती http://www.mahacet.org या संकेतस्थळावर दिली जाईल.