‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम करोनावर आक्रमण करून त्याला रोखणारी असून प्रत्येक सरपंचाने एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी व गावातील साऱ्यांनाच आरोग्यसंपन्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

ग्रामविकास विभागाने आयोजित केलेल्या राज्यभरातील सरपंचांच्या  मेळाव्यात दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. या मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती.

करोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सरपंचांनी आपापल्या गावातील लोक मुखपट्टय़ा घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का, हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का, अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केल्या.

करोनाविरुद्धची लढाई आता एकांगी राहणार नाही तर सर्वसामान्य लोक, नागरिक यांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका महिन्यात आपल्याला प्रत्येक घरी दोनदा भेट द्यायची आहे. यासाठी असलेली पथके सर्व घरी भेटी देतील याची जबाबदारी सरपंचांनी घ्यावी. मधल्या काळात करोना साथीचा संसर्ग वाढला असून त्याचा फैलाव थांबविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याची जाणीवही त्यांनी या वेळी सरपंचांना करून दिली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, तंटामुक्त चळवळ, हागणदारीमुक्त चळवळ अशा मोहिमांप्रमाणे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात यशस्वी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर पूर्वीच्या काळी साथ रोग आली की गावातील लोक शेतांवर जायचे, ते एकप्रकारे विलगीकरणच असायचे. आताही आपण आरोग्याचे काही नियम पाळले तर करोनाची साथ रोखू शकू, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

* पहिल्या टप्प्यात १० ऑक्टोबपर्यंत घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल.

* दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

* एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार.

* पहिल्या फेरीचा कालावधी २२ दिवसांचा, तर दुसरा १२ दिवसांचा असेल.

* ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, गाव- पाडे इत्यादी ठिकाणी राबविली जाणार आहे.