सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि गुजरातच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक गीता जोहरी यांनाही मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी दोषमुक्त केले.
त्यांच्यावर खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी घेण्यात आलेली नसल्याच्या आणि पुरावे नष्ट केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे पुढे आलेले नसल्याच्या कारणास्तव न्यायालयाने जोहरी यांना दोषमुक्त ठरविले.
यापूर्वी न्यायालयाने भाजप अध्यक्ष अमित शहा, राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया, राजस्थान येथील व्यावसायिक विमल पटनी आणि गुजरातचे माजी पोलीस आयुक्त पी. सी. पांडे यांनाही या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे.
जोहरी यांच्यावर तपासात विलंब केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला होता; परंतु त्यांच्यावर खटला चालविण्याबाबत आवश्यक असलेली परवानगी सरकारकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे  त्यांना दोषमुक्त केले.