ठाणे शहरातील धोकादायक आणि बेकायदा इमारतींच्या एकत्रित पुनर्विकास आराखडय़ावरून (क्लस्टर) शहरातील राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असून क्लस्टरच्या मंजुरीसाठी शिवसेनेने आयोजित केलेले आंदोलन नौटंकी असल्याची टीका बुधवारी काँग्रेस पक्षाने केली.
पुनर्विकासाचा नेमका आराखडा काय असावा, या संबंधीचा ठोस प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेला नाही. स्वत: चे काम करायचे नाही व क्लस्टर मंजूर होत नसल्याचे कारण सांगत आंदोलन छेडायचे, ही शिवसेनेची भूमिका म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. क्लस्टर योजना करताना नगरनियोजनाचे सर्वंकष धोरण ठरणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यावर सखोल अभ्यास सुरू आहे. मात्र नागरीकांचे अडवणूकीचे धोरण शिवसेना अवलंबित असल्याचा आरोप ठाणे शहराध्य बाळकृष्ण पुर्णेकर यांनी केला.