‘एफआयआर’ नोंदविण्यासाठी पोलिसांनी एक दिवसांचा विलंब केल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने हुंडाबळीच्या गुन्ह्यात कनिष्ठ न्यायालयाने दोषी धरून शिक्षा सुनावलेल्या तीन आरोपींना जामीन मंजूर केला.
न्या. विजया कापसे-ताहिलरामानी आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर साधू आमराळे आणि त्याच्या आईवडिलांनी शिक्षेविरोधात केलेले अपील तसेच जामीन अर्जावर सुनावणी झाली. या तिघांना कनिष्ठ न्यायालयाने साधूची पत्नी मीनाक्षी हिच्या हत्येप्रकरणी दोषी धरत शिक्षा सुनावली होती. पोलिसांच्या दाव्यानुसार, या तिघांनी १० जानेवारी २०११ रोजी मीनाक्षीला जाळले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने आईला सगळा सगळा घटनाक्रम सांगितला होता.  त्यानंतर लगेचच गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. परंतु पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ‘एफआयआर’ नोंदवला. मीनाक्षीने आईकडे दिलेल्या ‘मृत्यूपूर्व’ जबाबाच्या आधारेच साधू आणि त्याच्या आईवडिलांना दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती.
पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल करण्यासाठी एक दिवसांचा विलंब का केला याबाबत स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे नमूद करीत खंडपीठाने तिघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.