महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने गुरुवारी १३ एप्रिलपर्यंत वाढ केली. त्यामुळे भुजबळ काका-पुतण्याचा कारागृह मुक्काम वाढला असून त्यांना पाडवाही कारागृहातच साजरा करावा लागणार आहे.
भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनाही आर्थर रोड कारागृहातून ‘व्हिडीओ कॉन्फरन्स्िंाग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. कोठडी वाढवून देण्याबाबत एक तास सुनावणी सुरू होती. त्या वेळेस बाजूबाजूला बसलेले काका-पुतण्या मध्ये मध्ये एकमेकांशी बोलतही होते. कालिना येथील राज्य ग्रंथालयप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकतेच भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्या प्रकरणीही अधिक चौकशी करायची आहे. तसेच भुजबळ यांनी माजी सरकारी अधिकारी, सहकारी तसेच विश्वासू मंडळीमार्फत कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार केलेला आहे. या माहितीची शहानिशा करणे आणि तपासादरम्यान उघड होणाऱ्या इतर बाबींची चौकशी करायची आहे. शिवाय ओळख परेड सुरू आहे. त्यामुळे भुजबळांची कोठडीत वाढ करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाकडे केली. भुजबळांच्या वतीने त्याला विरोध करण्यात आला. मात्र न्यायालयाने ‘ईडी’ची मागणी मान्य करत भुजबळांची न्यायालयीन कोठडी १३ एप्रिलपर्यंत वाढवली.
गादी उपलब्ध करण्याची विनंती
माझी प्रकृती खूप बिघडली आहे. आधीच मला बरेचसे आजार आहेत, असे सांगत भुजबळांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळेस न्यायालयाकडे केली. भुजबळांनी या वेळेस आजारांचा पाढाही न्यायालयासमोर वाचला.