नववर्षाच्या पूर्व संध्येला आयोजित पार्टीत घडलेल्या संशयकल्लोळातून जान्हवी कुकरेजा या तरुणीची तिची मैत्रीण दिया पडळकर आणि प्रियकर श्री जोगधनकर यांनी हत्या के ल्याचा दावा खार पोलिसांनी आरोपपत्राद्वारे केला.

जान्हवीच्या हत्येस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी न्याय वैद्यक तज्ञांचे निष्कर्ष, पार्टीत उपस्थितांचे जबाब, त्यातून पुढे आलेले परिस्थितीजन्य पुरावे आरोपींचा दोष सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असा दावा खार पोलिसांनी केला.

जान्हवी मानसशास्त्र शाखेची विद्यार्थिनी होती. खार येथील भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीत ती बाल मैत्रीण दिया आणि प्रियकर श्री सोबत सहभागी झाली होती. अन्य उपस्थितांसह हे तिघेही मद्याच्या नशेत होते.

प्रियकर श्री आणि दिया यांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जान्हवी अस्वस्थ झाली. याच मुद्यावरून तिघांमध्ये इमारतीच्या जिन्यावर वाद झाला. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

श्री, दिया यांनी जान्हवीला अमानुष मारहाण केली. त्यात जान्हवीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत जान्हवीच्या शरीरावर मारहाणीच्या, फरफटत नेल्याच्या आणि भिंतीवर आपटल्याच्या ४८ जखमा आढळल्या.

हा सर्व घटनाक्र म खार पोलिसांनी एकू ण ७४ साक्षीदारांच्या जबाबातून आरोपपत्रात मांडला. यात न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील १० तज्ञांचे जबाब असून त्यांनी केलेल्या विविध चाचण्यांचे अहवाल आहेत. घटना घडण्याआधी श्री, दियासोबत जिन्यावरून खाली उतरताना, गच्चीवर जान्हवीला रडताना आणि आरोपी दियाला जखम साफ करताना पाहणाऱ्यांसह न्यायवैद्यक तज्ञांची साक्ष महत्त्वाची असल्याचे खार पोलिसांचे म्हणणे आहे. त्यासोबत घटनेनंतर मुख्य आरोपी श्री रक्ताळलेल्या कपड्यांनी इमारतीबाहेर पडतानाचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी आरोपपत्रात जोडले आहे.

जिन्यात धडपडल्याचे निमित्त करत श्री शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल झाला होता. तर दियाने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले होते.