News Flash

पंचतारांकित रुग्णालये गरीब रुग्णांच्या दारी

धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

रुग्णालये आता गरीब रुग्णांच्या सेवेसाठी गरिबांच्या दारी येणार आहेत.

धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनानंतर मोहीम; झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन मोफत तपासणी

पंचतारांकित धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील सर्व मोठमोठी रुग्णालये आता गरीब रुग्णांच्या सेवेसाठी गरिबांच्या दारी येणार आहेत. मुंबईतील झोपडपट्टी भागातील रुग्णांच्या मोफत वैद्यकीय तपासणीसाठी हिरानंदानी, हिंदुजा, भाटिया, सैफी अशी सर्वच धर्मादाय रुग्णालये शनिवारपासून मोहीम सुरू करत आहेत.

धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना दाखल करुन घेतले जात नसल्याचे एका रुग्णालयात करण्यात आलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आले होते. याची गंभीर दखल घेत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी सर्व धर्मादाय रुग्णालयांना नियमानुसार काम करण्याचा इशारा दिला होता. तसेच गरीब रुग्ण रुग्णालयांपर्यंत पोहोचत नसतील, तर रुग्णालयांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले होते.

आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील ७६ धर्मादाय रुग्णालये शनिवारी सकाळपासून शहरातील झोपडपट्टी परिसरात वैद्यकीय तपासणीची मोहीम सुरू करणार आहेत. यात एल.एच.हिरानंदानी, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी, पी.डी.हिंदुजा, भाटिया, एस.एल.रहेजा, जसलोक, सैफी यांसारख्या पंचतारांकित रुग्णालयांचा समावेश आहे. दादर येथील शुश्रूषा व गोदरेज या खासगी रुग्णालये स्वेच्छेने यात सहभागी झाली आहेत. ही रुग्णालये आपापल्या परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांची मोफत तपासणी करतील. यामध्ये चुनाभट्टीतील संजय गांधी नगर, वरळी डेरी, दादर फूल बाजार, विलेपार्लेतील इंदिरा नगर, विक्रोळी टागोर नगर, वडाळ्यातील वाल्मिकी नगर, बोरीवलीतील गणपत पाली नगर, घाटकोपर येथील नित्यानंद नगर, ठाण्यातील पाचपखडी यांसारख्या अनेक झोपडपट्टी भागात डॉक्टरांचा ताफा रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित असेल. मुंबईतील पदपथ, सिग्नल व रस्त्यावर राहणाऱ्या गरीब कुटुंबाचीही या मोहिमेत तपासणी करण्यात येणार आहे.

गरीब रुग्णांसाठी १०० हून अधिक रुग्णखाटा असलेल्या रुग्णालयांना ३ रुग्णवाहिका, ५० ते १०० रुग्णखाटा असलेल्यांसाठी २ आणि ५० हून कमी रुग्णखाटा असलेल्या रुग्णालयांसाठी १ रुग्णवाहिका आणणे बंधनकारक असेल. या प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ता व त्याच्यांसोबत प्राथमिक उपचाराची उपकरणे असतील. गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे हा या मोहीमेचा मुख्य हेतू असून तपासणीदरम्यान आढळलेल्या गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाईल, असे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी सांगितले. गरीब रुग्णांनी वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्राच्या साहाय्याने धर्मदाय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी पुढे यावे व रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन केले डिग्गे यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णसेवेची योजना मुंबईत राबवली जात असून त्यानंतर राज्यातील ४३७ धर्मादाय रुग्णालयांच्या सहकार्याने राज्यस्तरावरही राबविण्याचा मानस आहे, असे डिग्गे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 5:11 am

Web Title: charitable hospitals in maharashtra to reach doorsteps of poor patients
Next Stories
1  ‘मॅनहोल’चे झाकण ४८ तासांत दुरुस्त
2 मोबाइल तिकीट अ‍ॅपचा उत्साह जास्त, प्रतिसाद कमी
3 कमकुवत जिल्हा बँका मोडीत?
Just Now!
X