News Flash

पालिकेत शिवसेना ८५, भाजप ८३

या विजयामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या ८३वर पोहोचली आहे.

मुंबई महापालिका ( संग्रहीत छायाचित्र )

गिरकर यांच्या विजयानंतर कमळाला बळ; तर सेनेच्या संख्याबळातही एकने भर

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये नगरसेवकांच्या संख्येवरून सुरू असलेली रस्सीखेच अजूनही सुरू आहे. चारकोपमधील वॉर्ड क्रमांक २१मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांनी विजय मिळवल्याने भाजपचे संख्याबळ ८३वर पोहोचले आहे. तर दुसरीकडे, जात पडताळणीत बाद ठरलेल्या उमेदवाराच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ८५ वर गेली आहे. भाजपला दोन अपक्ष तर सेनेला तीन अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा असून दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या सहा नगरसेवकांचा निर्णय कोकण आयुक्तांकडे प्रलंबित आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत ९० हून अधिक जागांवर आघाडी घेतलेल्या शिवसेनेचा विजयरथ ८४ जागांवर थबकला व संध्याकाळी भाजपने ८२ जागांपर्यंत मजल मारली. भाजपने पहारेकरी राहून शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी तेव्हापासून अधिकाधिक नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गुरुवारी पुन्हा एकदा याचा अंक पाहायला मिळाला असून दोन्ही पक्षांची नगरसेवकसंख्या एकाने वाढली आहे.

चारकोप येथील वॉर्ड क्रमांक २१मधील भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवार बुधवारी मतदान पार पडले होते. याची मतमोजणी गुरुवारी पार पडून प्रतिभा गिरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. भाजपने शैलजा गिरकर यांची सून प्रतिभा यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेनेही त्यांना पाठिंबा जाहीर करत आपला उमेदवार याठिकाणी उभा केला नव्हता. त्यामुळे गिरकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. या विजयामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या ८३वर पोहोचली आहे.

दुसरीकडे, शिवसेनेच्या राजू पेडणेकर यांना गुरुवारीच नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आल्याने सेनेचे संख्याबळही एकने वाढले आहे. अंधेरी पश्चिम येथील प्रभाग ६२ मधून अपक्ष उमेदवार चंगेज जमाल मुल्तानी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र जातपडताळणीमध्ये त्यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे या प्रभागात १३ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक घ्यायचेही ठरले होते. मात्र याविरोधात शिवसेना न्यायालयात गेली. या विभागात सेनेच्या राजू पेडणेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. चंगेज जमाल मुल्तानी यांचे नगरसेवक बाद झाल्यामुळे न्यायालयाने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारे शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांना नगरसेवकपद देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुरुवारी पालिका सभागृहात राजू पेडणेकर यांना नगरसेवक म्हणून घोषित केले. त्यामुळे  सेनेच्या नगरसेवकांची संख्या ८४ वरून ८५ वर गेली.

गिरकर यांचा सहज विजय

भाजपच्या प्रतिभा गिरकर यांच्याविरोधात काँग्रेसकडून नीलम मधाळे मकवाना उभ्या होत्या. बुधवारी या मतदानासाठी ११ हजार ८०४ म्हणजेच अवघे २८ टक्के मतदान झाले. गुरुवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा गिरकर ७६०७ मताधिक्याने विजयी झाल्या. प्रतिभा गिरकर यांना ९५९१ तर नीलम मधाळे यांना १९८४ मते मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:55 am

Web Title: charkop by election won by bjp bmc shiv sena bjp
Next Stories
1 आईच्या अंत्यविधीसाठी १५ हजारांचे कर्ज
2 वीजग्राहकांना २०० कोटींचा भुर्दंड
3 विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कात कपात
Just Now!
X