रेल्वेच्या संथगती कारभाराचा पादचाऱ्यांना त्रास

जिन्याच्या पायऱ्या कोसळल्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या चर्नीरोड पादचारी पुलाच्या बांधकामासाठी रेल्वेला अजून वेळ मिळालेला नाही. या पुलाच्या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या रेल्वेच्याच उच्च दाबाच्या वीजवाहिन्या सुरक्षितपणे हलवण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने पादचारी पुलाचे कामही रखडले आहे. पादचारी पूल बंद असल्यामुळे चर्नी रोड स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहेच; पण अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे.

एल्फिन्स्टन येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच १४ ऑक्टोबर रोजी चर्नी रोड स्थानकाबाहेरील पादचारी पुलाच्या पायऱ्या कोसळून एक प्रवासी जखमी झाला. या घटनेनंतर गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातून बाबासाहेब जयकर मार्गावरून रेल्वे स्थानकात येणारा हा पादचारी पूल बंद आहे.

प्रत्यक्षात या पुलाची अवस्था अतिशय खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कंत्राटदाराने पुलाचा निम्मा भागही तोडला होता व निम्म्या भागातून प्रवाशांची ये-जा सुरू होती. मात्र, १४ ऑक्टोबरनंतर हा पूल पूर्णपणे बंद झाला आहे. आता परिसरातील रहिवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी महर्षी कर्वे मार्गावरून जावे लागते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी महर्षी कर्वे मार्गावर पादचाऱ्यांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. स्थानकावर उतरणारे प्रवासी मोठय़ा संख्येने रस्ता ओलांडण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडू लागला आहे. काही वेळा अपघातही होऊ लागले आहेत.

वीजवाहिन्यांचा अडथळा

या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुरुवातीला रेल्वेकडून पालिकेला सहकार्य मिळत नव्हते. मात्र अनेक बैठका झाल्यानंतर रेल्वे प्रशासन दुरुस्तीसाठी राजी झाले. पुलाचे पाडकाम झाल्यानंतर खोदकाम सुरू असताना रेल्वेच्या अतीउच्च दाबाच्या वीजवाहिन्या व सिग्नल यंत्रणेच्या ऑप्टिकल फायबर वाहिन्या रस्त्याखाली असल्याचे निदर्शनास आले. मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानच्या रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पुलासाठी पाया खोदणे अवघड बनले. या वाहिन्या अन्यत्र हलविण्यासाठी रस्ता खोदणे गरजेचे होते. पुलाची बांधणी जलदगतीने व्हावी म्हणून पालिकेने खोदकामावरील शुल्क माफ केले आहे. त्यानंतर रेल्वेने वाहिन्या अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले. परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतरच पालिकेला पूल बांधणीचे काम सुरू करणे शक्य होणार आहे.

पालिकेच्या पूल विभागामार्फत या पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला पूल दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. कामाला सुरुवातही झाली होती. मात्र रस्त्याखालील अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या व फायबर ऑप्टिकल वायर्स आढळल्याने पुलाच्या बांधणीत अडथळा निर्माण झाला आहे.

विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, डी विभाग कार्यालय