संदीप आचार्य

मुंबई : डॉक्टर अजय महाजन चार्टर विमानाने थेट अलाहाबादला पोहोचले. तेथून हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाची अँजिओप्लास्टी केली आणि लगेचच पुन्हा चार्टर विमानाने ते मुंबईला परतही आले. करोनाच्या काळात नियमित विमानसेवेपेक्षा चार्टर विमानसेवा जास्त सुरक्षित वाटत असल्याने थोडे जास्त पैसे लागत असले तरी मोठ्या प्रमाणात वकील, डॉक्टर तसेच खासगी कंपन्यांमधील व्यवस्थापनातील अधिकारी वर्गाने चार्टर विमानसेवेचा वापर करणेच पसंत केल्याचे दिसून येते.

 

जगभरात करोना पसरल्यानंतर भारतातही सावधानता म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउनच्या चार महिन्यात देशभरातील जवळपास सारेच व्यवहार ठप्प झाले होते. लोक घरातून बाहेर पडायलाही घाबरत होते. रोज जाहीर होणारी करोना रुग्ण व मृत्यूंची आकडेवारी सर्वांनाच अस्वस्थ करणारी होती. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर व अन्य कर्मचारी तसेच पोलीस वगळता फारसे कोणीच घराबाहेर पडत नव्हते. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने काही व्यवहार व उद्योग सुरु झाले. यातील अनेकांना कामानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या भागात जाणे आवश्यक होते. यात डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच उद्योग व्यवसायातील वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश होता. या वर्गाने एअर इंडिया तसेच जेटआदी खासगी विमानसेवेऐवजी चार्टर विमानसेवा वापरण्याला प्राधान्य दिले. लाखभर रुपये जास्त मोजायला लागले तरी चालेल परंतू करोनाचा त्रास नको ही भावना यामागे होती.

 

सामान्यपणे निवडणुकीत राजकीय पक्ष व नेते मोठ्या प्रमाणावर चार्टर विमानसेवा वा हेलिकॉप्टरचा वापर करतात. याशिवाय मोठे उद्योगपती वगळता फारच कमी प्रसंगात अन्य उच्चपदस्थ चार्टर विमानसेवेचा वापर करताना दिसतात. सामान्यपणे उद्योजक असो की राजकारणी तसेच वकील, डॉक्टर व उद्योग व्यवसायातील वरिष्ठ वर्ग हा खाजगी विमानसेवेत ‘बिझनेस क्लास’ने प्रवास करत असतात. तथापि करोनाच्या मागच्या सहा महिन्यात या सर्व वर्गाने चार्टर विमानसेवेचा प्राधान्याने वापर केल्याचे चार्टर खासगी विमानसेवा देणार्या ‘एमएबी’ कंपनीचे प्रमुख मंदार भारदे यांनी सांगितले.

भारतात आजघडीला चार आसनी ते १८ आसनी किंवा थोडी मोठी चार्टर विमाने साधारपणे १३२ आहेत तर १७९ हेलिकॉप्टर्स आहेत. एकूण १०० ऑपरेटर असून त्यांच्या माध्यमातून या विमान सेवेचे नियोजन केले जाते आमच्या ताफ्यात तीन विमाने असून यातील दोन दिल्ली तर एक मुंबईत असल्याचे मंदार भारदे यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात वकिल व डॉक्टरांकडूनही मोठ्या प्रमाणावर चार्टर विमानसेवेचा वापर झाला. यात वकीलांचे प्रमाण जास्त असून उद्योग व्यवसायातील व्यवस्थापनातील उच्चपदस्थांबरोबर मधल्या श्रेणीतील व्यवस्थपकांकडूनही मोठ्या प्रमाणात चार्टर सेवेचा वापर झाल्याचे मंदार भारदे म्हणाले.

आणखी एक गोष्ट या काळात आम्हाला आढळून आली ती म्हणजे मुंबईतील काही मोठ्या उद्योग व्यवसायातील लोकांनी कुटुंबासह गोव्यात जाऊन राहाणे पसंत केले. या उद्योगपतींनी गोव्यात तीन- चार महिन्यांसाठी बंगले भाड्याने घेतले व कुटुंबासह चार्टर विमानाने गोव्यात आले. कदाचित गोव्यात करोनापासून लांब राहाता येईल ही भूमिका त्यामागे दिसून आली. यात हेलिकॉप्टर व्यवसायाने मात्र मार खाल्ला. एकतर निवडणुका नाहीत तसेच राजकीय हालचाली कमी असल्यामुळे हेलिकॉप्टर व्यवसाय फारसा चालला नाही. मात्र चार्टर विमानसेवा किमान २५ टक्क्यांनी वाढल्याचे मंदार भारदे यांनी सांगितले. जी आठ ते बारा आसनी विमाने एरवी मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री व न्यायाधीशांकडून वापरली जात ती या करोना काळात डॉक्टर, वकिल तसेच व्यवस्थापन अधिकार् यांकडून सर्रास वापरण्यात येत आहेत. करोनाच्या भीतीमुळे खासगी विमानांऐवजी चार्टर विमाने वापरणे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या वर्गाने पसंत केले. सामान्यपणे चार सिटर वा छोट्या विमानांचे तासाचे भाडे एक लाख रुपये असते तर मोठी व जेट इंजिन असलेल्या विमानांचे भाडे दीड ते दोन लाख रुपये तास या दराने असते. करोनाकाळात अनेक उद्योगांना फटका बसत असताना चार्टर विमानसेवा मात्र जोरात चालली.