विभिन्न क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आणि स्वबळावर त्या क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि त्या कर्तृत्वातून इतरांना स्फूर्ती देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘व्हिवा लाउंज’चे २६ वे पर्व गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. केसरी प्रस्तुत आणि दिशा डायरेक्ट यांच्या सहकार्याने होणाऱ्या या ‘व्हिवा लाउंज’मध्ये या वेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती अभिनेत्री, लेखिका अमृता सुभाषशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात रंगेल.
‘श्वास’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘अस्तु’ आणि ‘किल्ला’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांतून भूमिका करत प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरलेली अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष! दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नाटय़ प्रशिक्षण संस्थेत पं. सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या अमृताने साकारलेली ‘ती फुलराणी’मधील मंजू आजही रसिकांच्या चांगलीच लक्षात असेल.
आव्हानात्मक भूमिकांचे सोने
मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून लक्षणीय भूमिका साकारणाऱ्या अमृताने आतापर्यंत अत्यंत आव्हानात्मक भूमिकांचे सोने केले आहे. त्याशिवाय ‘अवघाचि संसार’, ‘झोका’, ‘पाऊलखुणा’ आदी मालिकांमधील तिच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या. २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अस्तु’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला त्या वर्षीचा साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात आला.

‘चतुरंग’ मध्येही लिखाण
एकापेक्षा एक भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या अमृताने आपल्या लेखणीनेही त्यांची मने काबीज केली आहेत. ‘लोकसत्ता’मधील ‘चतुरंग’ या पुरवणीतील तिच्या ‘एक उलट-एक सुलट’ या सदरालाही उत्तम प्रतिसाद लाभला. या सदरातील निवडक लेखांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. अशा हरहुन्नरी अमृताशी गप्पा मारण्याची, तिच्या यशाचे रहस्य जाणून घेण्याची आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी मिळणार आहे.