अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून दादर येथील चाटे कोचिंग क्लासेसचे मालक मच्छिंद्र चाटे यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाटे गुरुवारी दुपारी पोलिसांपुढे हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीनावर सुटका केली.
अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याबद्दल क्लासमध्ये बुधवारी विद्यार्थी, पालक आणि चाटे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर संबंधित विद्यार्थिनी तिच्या दोन मैत्रिणी आणि एका विद्यार्थ्यासह चाटे यांच्या केबिनमध्ये गेल्या. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यासाठीच ते चाटे यांच्या केबिनमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे हे विद्यार्थी आणि चाटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर चाटे यांनी संबंधित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनी आणि इतर विद्यार्थी पोलिस ठाण्यात गेले आणि तिथे त्यांनी चाटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ती विद्यार्थिनी आणि दोन प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले आहेत. त्यानंतर चाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत.