विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’चे दोन दिवसीय ‘रंगसंमेलन’ २१ आणि २२ डिसेंबर रोजी डोंबिवलीत स. वा. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. संमेलनात चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना एअर चिफ मार्शल (निवृत्त) अनिल टिपणीस यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
लेखक आणि संगणक तज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते रंगसंमेलनाचे उद्घाटन होणार असून उद्योजक मधुकर चक्रदेव हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या रंगसंमेलनात रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. संमेलनाचे यंदा २३ वे वर्ष आहे.
रंगसंमेलनात ‘कालचे आणि आजचे क्रिकेट’ या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमात द्वारकनाथ संझगिरी, अजित वाडेकर, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, प्रवीण आमरे हे सहभागी होतील.
श्री समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत.
पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी लोकप्रिय केलेल्या ‘राम श्याम गुणगान’या कार्यक्रमातील गाणी अनुराधा मराठे आणि पं. उपेंद्र भट सादर करणार असून ‘पंचप्राण’या कार्यक्रमात बालगंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, वसंतराव देशपांडे यांची गाजलेली नाटय़गीतेही सादर होणार आहेत.
कलाकार व रसिक यांचे एकत्रित ‘चहापान’ संमेलनही असणार आहे.
रंगसंमेलनाच्या पूर्णोत्सव प्रवेशिका सात डिसेंबरपासून शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मिळू शकतील. चतुरंग गिरगाव आणि डोंबिवली कार्यालयात फक्त सायंकाळी पाच ते आठ या वेळेत प्रवेशिका उपलब्ध होतील. स्वागतयात्री देणगी योजनाही सुरू झाली आहे.
रंगसंमेलनाबाबत अधिक माहितीसाठी चतुरंग गिरगाव कार्यालयात (०२२-२३८९३२८२) दुपारी दोन ते रात्री नऊ किंवा डोंबिवली कार्यालयात (०२५१-२४२१२४२) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.