अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू

विरार : मुसळधार पावसामुळे नालासोपारा येथील एक चाळ कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.नालासोपाऱ्यातील काजूपाडा परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने साचून राहिलेल्या पाण्यामुळे बांधकामाचा पाया खचला जात आहे. काजूपाडा परिसरातील महावीर चाळ या बैठय़ा चाळीतील पाच खोल्या मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास अचानक कोसळल्या. प्रसंगावधान राखत रहिवाशांनी घराबाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आहे. पण या घटनेने पुन्हा जर्जर इमारती आणि चाळींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी तुळींज परिसरातही पावसामुळे चार मजली इमारतीचा भाग कोसळला होता.