07 March 2021

News Flash

संस्कृती समृद्ध चाळी..

गिरगाव चर्चपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक भलीमोठ्ठी चाळ

सात बेटांची मुंबई आकार घेत असतानाच गिरगाव चर्चपासून अगदी हाकेच्या अंतरावर एक भलीमोठ्ठी चाळ उभी राहिली. एक मजली एक आणि दुमजली तीन इमारती; मध्यभागी तीन मजली वाडा अशी या चाळींची रचना होती. लाकडी इमारत, माती-शेणाने सारवलेली जमीन. आपत्कालीन व्यवस्थापनाची काळजी घेत चाळींच्या दोन्ही बाजूला जिने. मध्यभागी तीन मजली वाडा. पुढे मागे प्रशस्त अंगण, अशी या चाळींची रचना होती. त्या काळी मालमत्तांमध्ये गुंतवणूक महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे व्यापारी आणि उत्तम मिळकत असलेल्या अनेक मंडळींनी चाळी उभ्या केल्या. या प्रतिष्ठितांपैकी एक असलेल्या पेंडसे यांनी या चाळी बांधल्या. तिथल्या वाडय़ामध्येच पेंडसे कुटुंब वास्तव्यास होते. त्यामुळे या चाळी पेंडसे वाडी म्हणून परिचित झाल्या. मुंबईत काम-धंद्याच्या शोधात आलेले बहुतांश ब्राह्मण कुटुंबांना या चाळी आधार बनल्या.

घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे अनंत शिवाजी देसाई बालवयातच कोकणातून मुंबईत दाखल झाले. कठोर परिश्रम करून ते नावारूपाला आले. पारतंत्र्यकाळात टोपी परिधान करण्याची अनेकांना सवय होती. त्यामुळे निरनिराळ्या आकाराच्या टोप्या बनवून त्यांचा व्यवसाय तेजीत आला. टोप्यांबरोबर अन्य काही जोडव्यवसायही त्यांनी सुरू केला. अल्पावधीतच ‘टोपीवाले’ ही उपाधी देसाई यांना मिळाली. दरम्यानच्या काळात कोकणातील कुडाळ व आसपासच्या मुलुखातून काम-धंद्याच्या शोधात कुडाळ देशकर ज्ञातिबांधव मोठय़ा संख्येने दाखल होत होते. नवा प्रांत आणि ओळख नसल्यामुळे अनेकांना निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मुंबईत ज्ञातिबांधवांसाठी काही तरी करायला हवे असे या कुटुंबाला सारखे वाटत होते. टोपीवाला यांचे पुत्र नारायण हेही कर्तबगार. पेंडसे यांनी बांधलेल्या या चाळी नारायण देसाई-टोपीवाले यांनी १९२६ मध्ये तब्बल तीन लाख रुपये मोजून खरेदी केल्या आणि पेंडसे वाडीचे नाव कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवास झाले. मुंबईत येणाऱ्या ज्ञातिबांधवांच्या निवाऱ्याची व्यवस्था निवासात करण्यात आली. पेंडसे वाडीतील ब्राह्मणांनी हळूहळू स्थलांतर केले आणि कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवासात ज्ञातिबांधवांची संख्या वाढली.

त्या काळात शिक्षणासाठी मोठय़ा संख्येने ज्ञातिबांधव मुंबईत येत होते. परंतु मुंबईत निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे ज्ञातीमधील तरुणांना अर्धवट शिक्षण सोडून गावची वाट धरावी लागत होती. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन नारायण देसाई-टोपीवाले यांनी कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवासामधील पेंडसे यांच्या तीन मजली वाडय़ाचे वसतिगृहात रूपांतर केले. वरच्या तिन्ही मजल्यांवर विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. नारायण देसाई-टोपीवाले यांनी आईच्या स्मरणार्थ हे वसतिगृह उपलब्ध केले. त्यामुळे हे वसतिगृह नर्मदाबाई वसतिगृह या नावाने परिचित झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळविणारे स. का. पाटील, कामगार नेते दत्ता सामंत, विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविलेले देवदत्त दाभोळकर यांच्यासह अनेक मंडळींनी याच वसतिगृहात वास्तव्याला राहून शिक्षण पूर्ण केले. या वसतिगृहाच्या आधारामुळे ज्ञातितील अनेक तरुण आजघडीला विविध क्षेत्रांत आघाडीच्या स्थानावर आहेत. तर याच इमारतीच्या तळमजल्यावरील विस्तृत जागा पालिकेला प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी देण्यात आली. त्यामुळे चाळीतील रहिवाशांच्या लहान मुलांना घराजवळच शाळा उपलब्ध झाली. नंतर वसतिगृहाची इमारत धोकादायक बनली आणि ती पाडावी लागली. त्यामुळे वसतिगृह आणि शाळा दोन्ही बंद झाली. ज्ञातिबांधवांची निवाऱ्याची वाढती गरज लक्षात घेऊन वसतिगृहाच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर आणखी एक दुमजली चाळ उभी करण्यात आली. आजही या चाळीचा उल्लेख नवी चाळ म्हणूनच केला जातो. टोपीवाले यांनी ग्रंथसंग्रहालय, वाचनालयही सुरू केले. त्यासाठी निवासात स्वतंत्र अशी इमारतच उभी करण्यात आली. त्याकाळी छोटेखानी कार्यक्रम साजरे करता यावे आणि ग्रंथसंग्रहालय व वाचनालय म्हणूनही वापर करता यावा अशी बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आली. बाल, कुमार वाङ्मयासह कथा, कादंबऱ्या, चरित्र असे विविध साहित्य ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध करण्यात आले होते. मराठीसोबतच इंग्रजी वाङ्मयही येथे वाचनप्रेमींना उपलब्ध करण्यात आले. ज्ञातीमधील तरुणांसाठी क्लब सुरू करण्यात आला. या क्लबमधील सराव करणाऱ्या अनेक तरुणांनी बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिसमध्ये प्रावीण्य मिळविले आणि विविध स्पर्धामध्ये चमकदार कामगिरीही पार पाडली. वसतिगृहाच्या पाठीमागे म्हणजे आतल्या वाडीत बॅडमिंटनसाठी कोर्टही उभारण्यात आले होते.   भजन, कीर्तनाची परंपराही या निवासाने जपली. महत्त्वाचे म्हणजे व्याख्यान संस्कृती समृद्ध करण्यासाठी निवासातील काही तरुणांनी एकत्र येऊन टोपीवाला व्याख्यानमाला सुरू केली. महाराष्ट्रातील अनेक मातबर वक्त्यांनी या व्याख्यानमालेला हजेरी लावली आहे. निरनिराळे आचार-विचार, विविध संस्कृतीची परंपरा जपणारी चाळ कात टाकण्याच्या बेतात आहे. मुंबईतील अन्य चाळींप्रमाणे  पुनर्विकासाचे वारे याही चाळीत वाहू लागले आहेत.

– प्रसाद रावकर

prasadraokar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 2:54 am

Web Title: chawl culture in mumbai
Next Stories
1 खाऊ खुशाल : पारंपरिक इराणी ‘बकलावा’
2 दिवाळीत सातवा वेतन आयोग?
3 इच्छामरणाचा हक्क आवश्यक!
Just Now!
X