टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्या भागीदारीतून सुरू झालेली ‘विस्तारा’ कंपनी देशात आपला ‘विस्तार’ सुरू करून तीन दिवस उलटत नाहीत, तोच ‘एअर इंडिया’ने आपल्या विमान तिकीट दरांमध्ये थेट ५० टक्क्यांची सवलत जाहीर करून तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. मुंबई-दिल्ली या मार्गावर आधी सहा ते नऊ हजार रुपयांपर्यंतचे तिकीट आता तीन हजार रुपयांत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ‘जेट एअरवेज’ आणि ‘इंडिगो’ या कंपन्यांनीही या स्पर्धेत उडी घेत आपल्या तिकीट दरांत चांगलीच सूट द्यायला सुरुवात केली आहे.
तिकिटाचे दर ३५ टक्के ते ५० टक्क्यांनी स्वस्त झाल्याने एप्रिल-मे महिन्यांसाठी रेल्वे तिकिटांची वाट न पाहता हजारो प्रवाशांनी विमानांचे तिकीट आरक्षित केले. त्यामुळे पर्यटन सेवा देणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांवरील व्यवहार जवळपास चौपट झाले आहेत.
‘विस्तारा’चे पंख छाटण्यासाठी ‘एअर इंडिया’ने भरभक्कम सवलत जाहीर करताच इतर कंपन्याही सरसावल्या. सवलतीच्या दरातील ही तिकिटे १८ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीसाठी आहेत. दरयुद्ध सुरू होताच बघता बघता मुंबई-दिल्ली या मार्गावरील सहा ते नऊ हजारांचे तिकीट २९५८ रुपये एवढय़ा अल्प दरात उपलब्ध होत आहे. दिल्ली-बेंगळुरू, दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-इंदूर या मार्गावरील तिकीट दर अनुक्रमे १८००, १५५८ आणि १५५८ रुपयांत उपलब्ध आहेत. इतर वेळी या मार्गावरील तिकिटांसाठी साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात.
‘इंडिगो’ आणि ‘जेट एअरवेज’ यांनीही आपल्या तिकीट दरांत घसघशीत सूट देऊ केली आहे.

स्पर्धा विमान कंपन्यांची, फायदा प्रवाशांना
कोणत्याही क्षेत्रात सेवा पुरवठादारांमध्ये स्पर्धा होणे स्वाभाविक आहे. आम्ही भारतात सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याच वेळी आम्हाला या स्पर्धेची कल्पना होती. तिकीट दर खाली येणार, हे आम्ही गृहीत धरले आहे. आम्हा विमान कंपन्यांच्या स्पर्धेमुळे प्रवाशांना फायदा मिळतो, त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच आहे.
– प्रवक्ता, विस्तारा हवाई कंपनी

प्रवाशांसाठी सुगीचे दिवस..
एअर इंडियाने सवलत देताच हवाई आरक्षणाने उसळी घेतली आहे. जेट एअरवेज आणि इंडिगो यांनीही आपले दर कमी केल्यामुळे प्रवाशांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन, व्हॅलेण्टाइन्स डेपाठोपाठ उन्हाळी सहलीसाठी जाणाऱ्यांनाही लाभ होणार आहे. आमच्या संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत थेट ४०० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे ‘यात्रा डॉट कॉम’तर्फे सांगण्यात आले.