अन्य राज्यांच्या तुलनेत छत्तीसगढमध्ये उद्योगांना २५ टक्क्यांहून अधिक स्वस्त वीज उपलब्ध असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’ मुळे सर्व परवानग्या केवळ महिनाभरात ऑनलाईन पध्दतीे दिल्या जातात, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी ‘लोकसत्ता’ ला नुकतेच सांगितले.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्ताने मुख्यमंत्री रमणसिंह मुंबईत आले आहेत. छत्तीसगढमध्ये असलेल्या उद्योगांसाठीच्या संधींबद्दल बोलताना रमणसिंह म्हणाले, उद्योगांना वीज, कच्चा माल या मूलभूत सुविधा महत्वाच्या असतात. निर्मिती उद्योगांसाठी वीज मोठय़ा प्रमाणावर लागते आणि ती स्वस्त असेल, तर उद्योग किफायतशीर ठरतो. महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा छत्तीसगढमध्ये उद्योगांना स्वस्त वीज दिली जात असून प्रतियुनिट पावणेसहा रुपये दराने वीजपुरवठा केला जातो, अशी माहिती रमणसिंह यांनी दिली.

छत्तीसगढमध्ये मुबलक खनिज संपत्ती असल्याने स्टील, सिमेंट व अन्य क्षेत्रातील उद्योग मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया व अन्य क्षेत्रांमध्येही गुंतवणूक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे रमणसिंह यांनी सांगितले.