लोकांना चांगल्या प्रतीचा आणि स्वस्तात भाजीपाला मिळावा यासाठी मुंबई-ठाण्यात लवकरच सरकारतर्फे भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. राज्य कृषी पणन मंडळ आणि मदर डेअरी संयुक्तपणे हा उपक्रम सुरू करीत असून त्यातून शेतकऱ्यांना, ग्राहकांना फायदा होण्याबरोबरच अनेकांना रोजगारही मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात नाशिक आणि पुणे परिसरात मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते. मात्र काही वेळा भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर शहरी भागात भाज्यांचे भाव कडाडतात, तर काही काही वेळा भाज्यांची आवक वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे भाजीपाल्यातील दराच्या चढउताराचा कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाला चांगला भाव मिळण्याबरोबरच ग्राहकांनाही चांगल्या प्रतीची भाजी तीही किफायतशीर किमतीत मिळावी यासाठी राज्याच्या कृषी आणि पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. पणनमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी दिल्लीतील मदर डेअरीच्या प्रकल्पाची पाहणी केली. मदर डेअरीने ३०० स्टॉल उभारले असून तेथे ताजा आणि चांगल्या प्रतीचा भाजीपाला तसेच दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले असून हे सर्व स्टॉल माजी सैनिकांना चालविण्यास देण्यात आले आहेत. त्यात ९ टक्के कमिशन दिले जाते. या योजनेतून दररोज तब्बल ३८० टन भाजीपाल्याची विक्री होते. त्याच धर्तीवर मुंबई-ठाण्यातही स्वस्त भाजीपाला आणि दूध विक्री केंद्रे सुरू करण्याची योजना राबविण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेतकरी आणि लोकांना फायदेशीर भाजीपाला विक्री केंद्रांची योजना दिल्ली आणि पंजाबमध्ये यशस्वी ठरली. मदर डेअरीने तर भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थाच्या पुढे जात धारा तेल हा ब्रँडही लोकप्रिय केला आहे. आपल्याकडेही अशीच ग्राहकांना दिलासा, तर शेतकऱ्यांना फायदा देणारी योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
चंद्रकांत पाटील, पणनमंत्री