07 August 2020

News Flash

बाजारगप्पा : उल्हासनगर बाजार : स्वस्तही अन् मस्तही

नक्कल केलेल्या वस्तूंची बाजारपेठ म्हणून उल्हारनगरच्या बाजाराची ओळख निर्माण झाली आहे.

नक्कल केलेल्या वस्तूंची बाजारपेठ म्हणून उल्हारनगरच्या बाजाराची ओळख निर्माण झाली आहे.

भारत व पाकिस्तानच्या फाळणीमुळे जे बेघर झाले. त्यात सिंधी समाज मोठय़ा संख्येने भारतात स्थलांतरित झाला. कल्याणपासून पाच किलोमीटर अंतरावरील सैनिकी बराकींमध्ये राहणाऱ्या निर्वासितांनी काही वर्षांत या परिसरात व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर साधारण १९४९ साली या शहराचे नामकरण करण्यात आले. आणि नव्या शहराबरोबरच नव्या व्यवसायाची सुरुवात झाली. हे शहर म्हणजेच आताचे उल्हासनगर.

नक्कल केलेल्या वस्तूंची बाजारपेठ म्हणून उल्हारनगरच्या बाजाराची ओळख निर्माण झाली आहे. ब्रँडसदृश वस्तू कमी किमतीत मिळाली की उल्हासनगरहून आणली का, असा प्रश्न सर्रास विचारला जातो आणि समोरची व्यक्ती ‘यूएस’हून (उल्हासनगर) आणल्याचे सांगून या विनोदात भरच घालत असते. या मागे खिल्ली उडवण्याचाच हेतू असतो. परंतु या बाजाराची गोष्टच वेगळी आहे. उल्हासनगरच्या बाजारात दरवर्षांला हजारो कोटींची उलाढाल होते. गेल्या काही वर्षांत ही संख्या वाढतच आहे. उल्हासनगरात फर्निचरचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे साधारण १९५० पासून या परिसरात फर्निचरची मोठमोठी दुकाने सुरू झाली. कालांतराने ही संख्या हजारांपर्यंत पोहोचली. सध्या या बाजारात सुमारे १५०० फर्निचरची दुकाने आहेत आणि या दुकानांचे मालक हे सिंधीच आहेत, हे महत्त्वाचे.

दुकानांमध्ये वॉर्डरोब, मोठय़ा आकाराचे बेड, विविध प्रकारचे कपाट, स्टूल, टेबल, टीव्ही स्टॅंड, पुस्तकांचे कपाट, खुर्च्या तेथे काही हजारांमध्ये उपलब्ध होतात. सध्या फर्निचरचा ट्रेंड बदलला असल्याने टिकाऊपेक्षा घराचे सौंदर्य खुलवणाऱ्या फर्निचरला मागणी जास्त आहे. तशी निर्मितीही येथे मोठय़ा प्रमाणावर असते. इतर ठिकाणी फर्निचरच्या किमती उल्हारनगरमध्ये मिळणाऱ्या फर्निचरपेक्षा दुप्पट असल्याचे दिसते. हे फर्निचर उल्हासनगर येथेच बनविले जाते. दुकानांच्या मागच्या बाजूलाच फर्निचर तयार करण्याचा कारखाना असतो आणि या कारखान्यात कारागीर फर्निचर तयार करीत असतात.

साध्या कपाटाची किंमत उल्हारनगरच्या बाजारात सहा ते सात हजारांपर्यंत आहे, तर मोठय़ा दुकानांमध्ये हेच कपाट १४ ते १५ हजारांपर्यंत विकले जाते. सोफा-कम-बेडच्या बाबतीतही हेच चित्र आहे. उल्हासनगरच्या बाजारात याची किंमत आठ हजार आहे, मात्र इतर फर्निचर दुकानात याची किंमत दुप्पट होते. मात्र लाकूड फर्निचरची मागणी केल्यास किमतीत काही प्रमाणात वाढ होते. प्लायवूडपासून तयार होणाऱ्या फर्निचरची किंमत लाकडी फर्निचरच्या तुलनेत स्वस्त असते. त्याशिवाय लाकडापासून विविध आकाराचे फर्निचर तयार करता येत नाही जे प्लायवूडमध्ये शक्य होते. त्यामुळे सध्या उल्हासनगरमधील अधिकांश वस्तू या प्लायवूडपासून तयार केलेल्या आहेत.

इतर सर्व बाजारांप्रमाणे उल्हासनगरच्या फर्निचर मार्केटनेही कात टाकली आहे. सुरुवातीला छोटय़ा स्वरूपाची ही दुकाने आता मोठमोठय़ा दुकानांशी स्पर्धा करू पाहत आहेत. अनेकदा ठाणे, डोंबिवली, बदलापूर या भागातील फर्निचरची दुकाने उल्हासनगरमध्ये वस्तू खरेदी करून जास्त किमतीत आपआपल्या दुकानात विकत असल्याचेही दिसते. मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय अगदीच मध्यमवर्गीयांमध्ये उल्हासनगर येथून फर्निचर खरेदी केले जाते. काही वर्षांनी पुन्हा बदलू या आशेने स्वस्तही पण मस्तही या उक्तीनुसार उल्हासनगर बाजाराची वाट धरतात.

उल्हासनगर या भागात आजही गेल्या ६७ वर्षांचे पडसाद दिसतात. काही दशकांपूर्वी या परिसराला छावणीचे स्वरूप होते. सैनिकी बराकींना कॅम्प एक, कॅम्प दोन अशी नावे देण्यात आली होती. आजही हा परिसर अशाच पद्धतीने ओळखला जातो. त्याशिवाय रस्त्यांवरील ठिकाणींची नावे दर्शविणाऱ्या पाटय़ांवर इंग्रजी, हिंदी बरोबरच सिंधी भाषेचाही समावेश केला आहे. या भागातील प्रत्येक दुकानाच्या पाटीवर इंग्रजीबरोबरच सिंधी भाषेत दुकानांची नावे लिहिल्याचे दिसते. सध्याचे तरुण पारंपरिक व्यवसायात न रमता परदेशात किंवा नोकरी करण्याला प्राधान्य देत आहेत, असे मुंबईतील अनेक व्यावसायिकांचे दु:ख आहे. मात्र उल्हासनगरचा बाजार याला अपवाद आहे. सिंधी समाजातील नवी पिढीही फर्निचरच्या व्यवसायात उतरत असल्याचे दिसते. नोटाबंदीच्या काळात इतर बाजारांप्रमाणे या बाजारावरही मोठा परिणाम झाला होता. याचा अधिक फटका कारागिरांना बसला होता. मात्र बाजार त्यातून सावरला आहे. आणि गर्दीचा बाजार दुकानदार अनुभवत आहे.

मीनल गांगुर्डे  meenal.gangurde8@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 3:16 am

Web Title: cheaper and cool ulhasnagar market
Next Stories
1 दळण आणि ‘वळण’ : परिवहन विभाग ‘चाचणी मार्गा’बाहेर
2 तपासचक्र : पोलीसपत्नीच दरोडय़ाची सूत्रधार
3 दुरुस्तीला ‘मसाप’कडे वेळच नाही
Just Now!
X