अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय तसेच मुंबई विद्यापीठासह महापालिकेची अनधिकृत बांधकामप्रकरणी फसवणूक केल्याबद्दल शीव येथील पद्मभूषण वसंतदाद पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य केटीव्ही रेड्डी, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा आशालता फाळके तसेच माजी सचिव धनाजीराव जाधव यांच्याविरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुदलात एआयसीटीई, डीटीई तसेच मुंबई विद्यापीठाची फसवणूक झाली असल्यामुळे संबंधित संस्थांनी तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. तथापि या संस्थांनी आपल्या अहवालात फसवणूक केल्याचे नमूद करूनही कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महेशसिंग ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर महाविद्यालयाच्या आजी-माजी प्रचार्य तसेच संस्थाचालकांनी शासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे उघडकीस आल्याने संबंधिताविरोधात कलम ४२०,४६३,४६८ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच पदविका महाविद्यालयाला मान्यता मिळवताना खोटी माहिती व कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले आहे.
मान्यतेसाठी खोटी कागदपत्रे
‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’, राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय तसेच मुंबई विद्यापीठाकडे या महाविद्यालयाबाबत सिटिझन फोरमने पुराव्यानीशी तक्रारी दाखल केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत वसंतदादा पाटील अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालयाने मान्यता मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबतचे अहवालही संबधित संस्थांनी मांडले. मात्र या तिन्ही यंत्रणांनी महाविद्यालयाविरोधात फौजदारी कारवाई करणे शक्य असूनही ती शेवटपर्यंत केली नाही, असे सांगून महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, या तिन्ही संस्थांच्या संबधितांवरही कारवाई व्हावी यासाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क असून अपुरे शिक्षक, सोयीसुविधांचा अभवा अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, असेही राजे यांनी सांगितले.