राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे विविध गुन्हे दाखल होत असतानाच शनिवारी त्यांच्या विरोधातील फसवणुकीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतर्फे खारघर येथे ‘हेक्स वर्ल्ड सिटी’ हा विशाल गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र तो ज्या जागेवर आहे त्याचा ताबा वा त्यासंबंधीच्या परवानग्या या कंपनीकडे नाहीत; तरीही तेथील सदनिका विकण्यात आल्या व त्यापायी घर खरेदीदारांकडून सुमारे ४५ कोटी रुपये घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी पंकज व समीर भुजबळ यांच्यासह कंपनीच्या अन्य तीन संचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ट्रॉम्बे येथील एका रंगकाम कंत्राटदाराने याबाबतची तक्रार दिली आहे. पनवेल तालुक्यातील मौजे रोहिंजण येथील सव्‍‌र्हे क्रमांक ९१/१ शेजारील २५ एकर जागेवर हेक्स वर्ल्ड सिटी गृहप्रकल्प देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी उभारत आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ जवळच हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात तीन हजार ३४४ सदनिकाधारकांनी २००९मध्ये नोंदणी केली. त्यांच्याकडून घराच्या किमतीच्या आठ टक्के रक्कम देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आगाऊ घेतली. तीन वर्षांत घरे बांधून देतो असा वायदा कंपनीने केला होता. मात्र अद्याप या प्रकल्पातील कोणत्याही घराचा ताबा देण्यात आलेला नाही. मुळात ज्या जागेवर हा प्रकल्प बांधण्यात येत आहे ती जागाही अजून देविशा कंपनीच्या ताब्यात नाही, असा घर खरेदीदारांचा आरोप आहे. तसेच गृहप्रकल्पाला आवश्यक काही शासकीय परवानग्याही अजून घेतलेल्या नाहीत. त्याचबरोबर सदनिकेच्या रकमेचे करारपत्रही देविशा कंपनीने केले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच संतप्त खरेदीदारांनी पोलिसांत धाव घेतली. देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे पंकज भुजबळ, समीर भुजबळ, माधव धारप, सायन अप्पा केसरकर, अमित बलराज हे भागीदार आहेत. हेक्स वर्ल्ड सिटीची जागा देविशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या किंवा भुजबळ कुटुंबीयांच्या नावावर नाही, असा दावा या सिटीमधील गुंतवणूकदारांनी केल्याने व तसे पुरावे पोलिसांना दिल्याने भुजबळ कुटुंबीय अडचणीत आले असून, तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. क्र. ५९/२०१५) नोंदविण्यात आला आहे. जागा नावावर नसताना हजारो घर खरेदीदारांकडून सदनिकांसाठीची रक्कम का स्वीकारण्यात आली याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांची गुप्तता
नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गुप्तता बाळगली असून प्रसारमाध्यमांपर्यंत ही बातमी पोहोचू नये यासाठी कसोशीचे प्रयत्न केले जात होते. तळोजा पोलिसांनीही कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देणार नसल्याचे स्पष्ट केले.

तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले : छगन भुजबळ
खारघर येथे निवासी प्रकल्पाची ही जागा आमच्या कंपनीच्या ताब्यात आहे. नऊ इमारतींचे काम जोत्यापर्यंत झाले आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण आणि सिडको या दोन शासकीय यंत्रणांकडून काही परवानग्या मिळण्यास विलंब लागल्याने हे काम रखडले आहे. यामुळे कंपनीकडे जागाच नाही किंवा भुजबळ यांनी फसवणूक केली हा आरोप धादांत खोटा असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ललित टेकचंदानी हे पूर्वी आमच्याबरोबर होते. त्यांच्या कंपनीतील चार जणांनी या प्रकल्पात सदनिका खरेदीकरिता पैसे भरले होते. मधल्या काळात टेकचंदानी यांचे आमच्या कंपनीशी बिनसले. त्यातूनच त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली, असे ते म्हणाले. प्रकल्पास विलंब झाल्याने ज्यांनी मागणी केली त्यांना पैसे परत देण्यात आले आहेत याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले. हे सारे दिवाणी प्रकरण असताना फौजदारी गुन्हा कसा काय दाखल झाला हेच समजत नाही. एखाद्याला राजकीयदृष्टय़ा बरबाद करण्याचे दुष्ट राजकारण सुरू आहे, असे भुजबळ म्हणाले.