* महिलेस २२ लाखांचा गंडा
* नायजेरियनसह पाच भारतीय नागरिकांना अटक
अवघ्या तीन महिन्यांची फेसबुकवरील मैत्री..त्यातूनच जवळीक वाढली अन् व्यवसायात भागीदार झाले..याच संधीचा फायदा घेऊन त्याने तिला भावनिक ई-मेल धाडला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली..त्याच्याकडून पाच लाख पाऊंडस् मिळणार म्हणून ती आयुष्यभराची जमापुंजी गमावून बसली.. हा प्रकार घडला आहे, ठाणे येथील राबोडी भागात राहणाऱ्या एका सुशिक्षित महिलेच्या बाबतीत. या प्रकरणाचा ठाणे पोलिसांनी छडा लावून एक नायजेरियन आणि पाच भारतीय नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या आरोपींनी मुंबईतील वेगवेगळ्या बँकांमध्ये उघडलेल्या सुमारे २५ ते ३० खात्यांमध्ये सुमारे तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
ठाणे येथील राबोडी भागात एक ४५ वर्षीय महिला राहत असून ती अविवाहित आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तिची फेसबुकवर परदेशातील एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री झाली. दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याची बतावणी करून त्याने तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर त्याने तिला व्यवसायामध्ये भागीदार होण्याचे आमिष दाखविले, त्यास तिनेही लगेच होकार दिला. विशेष म्हणजे, हा सर्व संवाद फेसबुकवरील चॅटिंगवरच सुरू होता. दोघेही प्रत्यक्षात एकमेकांना भेटले नव्हते. तसेच फेसबुकवर तयार केलेल्या बनावट प्रोफाइलद्वारे तो तिच्याशी संवाद साधत होता. एके दिवशी त्याने तिला एक ई-मेल धाडला, त्यामध्ये मलेशिया येथील एका बेटावर अडकलो असून त्सुनामी आणि समुद्री चाच्यांनी घेरले आहे, असे म्हटले होते. तसेच माझ्याकडे सुमारे पाच लाख पाऊंडस्, क्रेडिट कार्ड, चेक बुक असून हे सर्व जवळची मैत्रीण म्हणून तुला द्यायचे आहे. एका आंतरराष्ट्रीय कुरीअरच्या माध्यमातून हे सर्व पाठविण्याची इच्छा आहे, असेही त्याने ई-मेलमध्ये म्हटले होते. त्याच्या भावनिक ई-मेल आणि त्यातील पैशांच्या आमिषाला ती भाळली आणि ती त्याच्या जाळ्यात अलगदपणे अडकली.  टॅक्स, कस्टम अधिकारी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्याने तिला विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार, तिने पाच लाख पाऊंडस् मिळणार या आशेपोटी सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यातून मिळालेले पैसे आणि आयुष्यभराची जमा पुंजी त्याच्या स्वाधीन केली. आतापर्यंत तिने त्याच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये २२ लाख रुपये भरले आहेत. मात्र, तरीही पैशांची मागणी होऊ लागल्याने अखेर आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने थेट ठाणे पोलिसांकडे धाव घेतली.  या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे आर्थिक तसेच सायबर गुन्हे अन्वेषण शाखा, खंडणीविरोधी पथक यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करून सहा जणांना अटक केली. अभुल आयमन (२५), असे नायजेरियनचे, तर सागर दिलीप माईनकर ऊर्फ संदीप प्रकाश जोशी ऊर्फ सचिन वसंत कादे ऊर्फ सुहास जाधव ऊर्फ समीर कर्णिक (३४), मोहम्मद जफीर नौशाद ऊर्फ विकी (२७), मंगेश प्रकाश जाधव (३१), कमलेश हिम्मतलाल सोनी (४७), किशोर जयंतीलाल सोनी (५४), अशी भारतीयांची नावे आहेत. हे सर्व जण मीरा रोड तसेच मुंबई भागात राहणारे आहेत.