आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने कारवाई केलेल्या १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांना यंदाच्या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी ते अंतिम निकाल लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आहेत. परिणामी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आणि निकाल महाविद्यालयांच्या विरोधात गेला तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी त्यांची स्वत:ची असणार आहे. मात्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आजही त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दडवली जात असल्याचा गंभीर आरोप ‘सिटिझन फोरम’ या संस्थेने केला आहे.
सध्या अभियांत्रिकीच्या कॅप राऊंड सुरू असून ज्या १४ महाविद्यालयांवर कारवाई करून त्यांना २०१४-१५ सालासाठी प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्याचा निर्णय एआयसीटीईने घेतला त्यासंदर्भातील न्यायालयाचा निर्णय आणि त्याचे परिणाम या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांना कळणे आवश्यक आहे. अधिकृतपणे न्यायालयाचा निर्णय ‘डिटीई’च्या वेबसाइटवर टाकणे ही तंत्रशिक्षण संचालक सुभष महाजन यांची जबाबदारी असून ते जाणीवपूर्वक संस्थाचालकांचे भले करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे सिटिझन फोरमचे म्हणणे आहे. उच्चन्यायालयाने एआयसीटीईच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेत संबंधित महाविद्यालयांना सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे अंतिम निकाल य महाविद्यालयांच्या विरोधात गेल्यास विद्यार्थ्यांची जबाबदारी ही त्यांची स्वत:ची राहणार आहे.
या सर्व महाविद्यालयाची एकत्रित प्रवेशक्षमता सुमारे सात हजार एवढी असून या सर्व विद्यार्थ्यांना निकाल विरोधात गेल्यास अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयात सामावून घेणे हे तंत्रशिक्षण संचालनालयाला शक्य नाही, याची सुस्पष्ट कल्पना डिटिईच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असताना न्यायालयाच्या निकालाची तसेच संचालनालयाच्या क्षमतेची कोणतीही माहिती विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली नाही. खरेतर वर्तमानपत्रातूनही जाहिरात देऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे सिटिझनचे प्राध्यापक समिर नानिवडेकर, वैभव नरवडे आणि शेळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. संचालनालयातील अधिकाऱ्यांचे आणि संस्थाचालकांचे साटेलोटे असल्याबाबतची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. न्यायालयानेही चौदाही महाविद्यालयांना त्यांच्या त्रुटी कशा दूर करणार याबाबत एका आठवडय़ात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलेले आहे. यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे पुरेशी जागा नाही तर काही महाविद्यालयांच्या आवारात अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. याशिवाय शिक्षकांच्या त्रुटीसह अनेक मुद्दे असून विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना काळजी घ्यावी, असे आवाहनही सिटिझन फोरमने केले आहे.