News Flash

ग्रहणात उत्साह नांदतो..

मुंबई परिसरात ढगाळ वातावरण असल्याने सकाळी ८.०४ वाजल्यापासून ग्रहणारंभ पाहण्यात अडचणी येत होत्या.

खंडग्रास सूर्यग्रहण निरीक्षणासाठी मुंबईकरांच्या नाना तऱ्हा

सूर्यग्रहण म्हटलं की औदासीन्य, अशुभ असे मानणारी अंधश्रद्धा मोडीत काढत मुंबईकरांनी गुरुवारी मोठय़ा उत्साहाने ग्रहण निरीक्षणाचा आनंद लुटला. कोणी दुर्बिणीतून, कोणी सौर चष्म्यातून, तर कोणी मोठय़ा पडद्यावर तर कोणी चक्क विमानातून गुरुवारी खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवले. ग्रहणाच्या सुरुवातीला जरी ढगाळ वातावरण असले तरी नंतर मात्र चांगलीच उघडीप मिळाल्यामुळे मुंबई आणि परिसरातील हजारो लोकांनी भरदिवसा चंद्रकोरीसम ‘सूर्यकोर’ पाहिली.

मुंबई परिसरात ढगाळ वातावरण असल्याने सकाळी ८.०४ वाजल्यापासून ग्रहणारंभ पाहण्यात अडचणी येत होत्या. मात्र, जसजसा ग्रहणमध्य जवळ येऊ  लागला तसे आकाश स्वच्छ होऊ  लागले आणि पाहता पाहता ९.२० च्या दरम्यान ९० टक्के सूर्य झाकला गेला. भरदिवसा काहीसे अंधारून आले. हा सोहळा अनुभवण्यासाठी खगोलप्रेमींसह उत्साही मुंबईकरांनीही वेगवेगळय़ा ठिकाणी गर्दी केली होती. नेहरू विज्ञान केंद्र, नेहरू तारांगण आणि होमी भाभा केंद्र येथे ग्रहण पाहण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. या तीनही ठिकाणी मोठय़ा पडद्यावर प्रोजेक्शनद्वारे ग्रहण पाहण्याची सुविधा होती. ग्रहणाबाबतची वैज्ञानिक  माहितीदेखील या वेळी सर्व ठिकाणी देण्यात आली. नेहरू केंद्रकातर्फे ग्रहण काळातील खाण्यापिण्याच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून या वेळी चहा-बिस्कीट देण्यात आले.

या केंद्रकाशिवाय अनेक  हौशी लोकांनी इमारतींच्या गच्चीवरून दुर्बिणीतून एक्स-रे फिल्म, फोटो निगेटिव्ह, विशेष चष्मे यांच्या साहाय्याने ग्रहण पाहिले. अनेकांनी खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशासमोर चाळणी धरून त्यातून सूर्यकोरीच्या अनेक  प्रतिमा अनुभवल्या. काही ठिकाणी तर खिडकीच्या काळ्या काचेतून ग्रहण पाहण्यात आले. काही हौशींनी टबमध्ये पाणी भरून त्यात पडलेले प्रतिबिंब कॅमेऱ्यात टिपले. तर काही हौशी छायाचित्रकारांनी कॅमेरा लेन्स समोर एक्स-रे फिल्म धरून ग्रहण टिपले.

खगोल मंडळाकडून तीन हजार जणांना ग्रहणदर्शन

  •  खगोल मंडळ या मुंबई आणि महानगर परिसरात कार्यरत असलेल्या संस्थेने कल्याण, बदलापूर आणि उटी येथे ग्रहण पाहण्यासाठी सर्व तांत्रिक  सुविधांसह विशेष कार्यक्रम केले. कल्याण आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक   हजारपेक्षा अधिक  खगोलप्रेमी जमा झाले होते. तर उटी येथे खगोल मंडळाचे १५० सदस्य गेले होते. त्याबरोबरच तेथे असलेल्या ४०० पर्यटकांनीदेखील खगोल मंडळाच्या सुविधेचा लाभ घेतला.
  •  उटी आणि कन्नूर येथील हवा स्वच्छ असल्यामुळे पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण अनुभवता आले. मात्र कोईम्बतूर येथे गेलेल्यांच्या पदरी निराशाच आली.
  •  एका खास मोहिमेत मुंबईतील सहा शास्त्रज्ञांनी १२ हजार फुटांवरून खंडग्रास ग्रहण पाहिले. स्पेस गीक्स आणि एमएबी एव्हिएशन यांनी हा खास ग्रहणदौरा आखला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:04 am

Web Title: check out mumbais many solar eclipse observations akp 94
Next Stories
1 पालिका शिक्षण समिती उत्तराखंडमध्ये अभ्यास दौऱ्यावर
2 हिरामणी तिवारींना मारहाण आणि मुंडण प्रकरणी चार शिवसैनिकांना अटक
3 भाजपा आमदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Just Now!
X