चेंबूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; चोरीमध्ये लहान मुलेही आघाडीवर पूर्व द्रुतगती मार्गावरील अमर महल उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकरिता आणण्यात आलेल्या लोखंडी सामानाची चोरी होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. दुरुस्तीकरिता आणल्या गेलेल्या सामानाच्या सुरक्षेकडे कुणाचेच लक्ष नसल्याने या परिसरातील लहान मुलेदेखील इथले छोटेमोठे साहित्य घेऊन पोबारा करत असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९५ रोजी पश्चिम द्रुतगती मार्गावर हा पहिला लोखंडी सांधे असलेला उड्डाणपूल बनवला. गेल्या वर्षी अचानक हा पूल खचला. त्यामुळे गेले वर्षभर या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. असाच वैशिष्टय़पूर्ण पूल नवी मुंबईतील बेलापूर येथेही बांधण्यात आला आहे. या पुलाची कार्यक्षमता ५० वर्षे होती. मात्र गेल्या अनेक वर्षांत कंत्राटदार कंपनीने पुलाकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची अवस्था खराब झाली होती. एप्रिल, २०१७ला या पुलाचे पाच सांधे तुटल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवस या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर काही दिवस या पुलाची पाहणी केल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या एका बाजूचे काम करण्यास सुरुवात केली. यासाठी या पुलाला लावण्यात आलेले सर्व लोखंड काढण्यात आले. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने या लोखंडाची मोठय़ा प्रमाणात चोरी होत आहे. पुलाच्या बांधकामाकरिता आणण्यात आलेल्या सामानाची देखील चोरी होत आहे. याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे. चोरीच्या घटना समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली. मात्र सुरक्षारक्षक असतानाही या ठिकाणी दिवसाढवळ्या चोऱ्या सुरूच आहेत. याच उड्डाणपुलाखाली राहणारे काही गर्दुल्ले नशेसाठी या चोऱ्या करत असल्याचा संशय आहे. अनेकदा या परिसरातील लहान मुलेदेखील दिवसाढवळ्या अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून पोबारा करत असल्याचे दिसून येते. हटकल्यास हल्ला याबाबत येथील सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली असता अपुऱ्या मनुष्यबळामुळे चोऱ्यांना आळा घालता येत नसल्याची अडचण त्यांनी सांगितली. पुलाच्या सामानाची देखभाल करण्याकरिता केवळ दोन ते तीन सुरक्षारक्षक आहेत. चोरी करणाऱ्या मुलांना अथवा गर्दुल्ल्यांना हटकले तर तेच आम्हाला मारायला येतात, अशी माहिती एका सुरक्षारक्षकाने दिली आहे.