चेंबूरमधील काही वृद्ध महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या गृहउद्योगाच्या भरभराटीची चिन्हे आहेत. वर्षभर विविध सणांसाठी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या वृद्ध महिलांनी दिवाळीत केलेल्या दिवाळी फराळाला परदेशात मागणी वाढली आहे.

टिळकनगर परिसरात राहणाऱ्या शोभना गोगटे (वय ८४) आणि शीला बर्वे (वय ८३) यांनी २३ वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला गृह उद्योग या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून या महिला विविध सणांच्या वेळी विविध पदार्थ तयार करून ते ऑर्डरप्रमाणे विकत आहेत. त्यांच्यासोबत सध्या १० ते १२ अन्य वृद्ध महिलाही काम करीत आहेत. सत्यनारायण, बारसे, वाढदिवस वा इतर कार्यक्रमांसाठी मागणीनुसार या महिलांकडून पदार्थ तयार करून दिले जातात. होळी, गुढीपाडवा या दिवशी तर पुरणपोळीसाठी या ठिकाणी ग्राहकांची झुंबड उडते. दिवाळीत करंज्या चकली, लाडू, अनारसा, चिवडा, शेव, शंकरपाळे आणि बेसन लाडूच्या पिठाला मोठी मागणी असते. त्यामुळे महिनाभर अधीपासूनच या ठिकाणी दिवाळीच्या फराळाची तयार सुरू होते. यंदा परदेशातूनही अनेकांनी फराळाची मागणी असल्याचे गोगटे यांनी सांगितले.