चेंबूरच्या भारतनगरमध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत पहाटेपर्यंत कोणत्याच यंत्रणा मदतीला पोहोचू शकल्या नाहीत. परिसरातील जवळपास ५० रहिवाशांनी मदतकार्य सुरू करून अनेकांचे प्राण वाचविले. मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यापासून ते रुग्णालयापर्यंतची धावपळ असेच सारेच या मंडळींनी खांद्यावर पेलले.

‘माझ्या घरात पाणी शिरल्यामुळे रात्री पाणी काढत होतो. त्या वेळी मोठा आवाज झाला. थोडय़ाच वेळात भावाच्या घरावर झाड पडल्याचा फोन आला तसा मी धावत सुटलो. एकाच रांगेतील पाच घरे जमीनदोस्त झाली होती आणि मातीचे ढिगारे दिसत होते. आता काय करायचे असे एक क्षण सुचेना पण मागे हटून चालणार नव्हते. सगळेच रहिवासी धावून आले. जवळपास ५० जणांनी जमेल तसे ढिगारा उपसायला सुरुवात केली,’ असे नवनाथ बोरसे यांनी सांगितले.

पालिका, पोलीस, अग्निशमन यंत्रणा यांना वारंवार फोन करूनही पहाटेपर्यंत कोणीच फिरकलेही नाही. त्यामुळे आम्हीच अडकलेल्यांना काढायचा प्रयत्न करत होतो. माझ्या आत्याच्या घराच्या बाजूच्या घरात चार मुली अडकल्या होत्या. त्यांना खेचून घराबाहेर काढले आणि रुग्णालयात पाठविले, असे गोरसे कुटुंबीयाचे नातेवाईक स्वप्निल डावरे याने सांगितले.  साडेपाचच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारणचे अधिकारी आले तेव्हा ढिगारे उपसण्यास सुरुवात झाली. वेळीच यंत्रणा आल्या असत्या तरी ढिगाऱ्याखाली गुदमरलेले अनेकजण वाचले असते, असे मत संतोष वाघमारे यांनी व्यक्त केले.

नातलगांकडे गेल्याने बचावले

रविवारी झालेल्या दुर्घटनेने भारतनगरचे रहिवाशी गोरसे कुटुंबावर घाला घातला आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू या घटनेत झाला असून दोन मुले त्यांच्या  मावशीमुळे वाचली आहेत. पंडित गोरसे(५०), त्यांची पत्नी छाया(४७) यांना चार मुली. त्यांच्या विवाहित मुलीही घराजवळच राहत होत्या. पंडित यांच्यासह पत्नी छाया, प्राची(१५) आणि विवाहित मुलगी पल्लवी दुपारगडे यांचा घटनेत मृत्यू झाला आहे. रविवार सुट्टी असल्यामुळे शनिवारी रात्री पल्लवीच्या दोन्ही लहान मुलांना जवळच राहत असलेल्या त्यांच्या बहिणीने घरी राहायला बोलावले होते. त्यामुळे ते वाचले.

वीज विभागाकडूनही वेळेत प्रतिसाद नाही 

विजेच्या ताराही तुटल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे धक्के बसत होते. त्यामुळे लवकरात लवकर वीजपुरवठा बंद करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता. परंतु तब्बल एक तासाभराने वीज विभागाने पुरवठा बंद केला, अशी माहिती रहिवासी ज्ञानेश्वर येरवडे यांनी दिली.