रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अरुंद रस्त्यामुळे चेंबूरच्या वाशी नाका परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिकांना भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. येथील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून वाहनचालकांसह स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चेंबूरच्या वाशी नाका आणि माहुल परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि एजीस यांसारख्या अनेक गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांचा उपयोग केला जातो. मात्र येथील गव्हाण गावाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी एक ते दीड तास या वाहतूक कोंडीत घालवावा लागत आहे. शिवाय या अवजड वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

कामास प्रारंभ

वाशी नाका येथील शंकर देऊळ चौक ते गव्हाण गाव हा रस्ता अगदीच लहान असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा रस्ता ९० फुटांचा करावा, अशी मागणी पालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने या रस्त्याला मंजुरी दिली असून गुरुवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.