एटीएसने मंगळवारी ताब्यात घेतलेल्या ९ संशयित दहशतवाद्यांकडून घातक रसायने, धारदार चाकू, मोबाइल्स आणि सिम कार्ड्स जप्त केले आहेत. या संशयित दहशतवाद्यांचा अन्नपदार्थांत किंवा पाण्यात विषारी रसायन मिसळून घातपात करण्याचा कट होता. सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयितांना मुंब्रा आणि औरंगाबाद येथून मंगळवारी अटक करण्यात आली होती. कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता.

संशयितांपैकी झमेन हा वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) होता. त्याला रसायनाबाबत माहिती होती. त्याच्या मदतीने हा रसायन हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. रासायनिक हल्ला घडवून आणण्यासाठी मोहसिनने झमेनला सामील करून घेतले होते. एटीएसने ताब्यात घेतलेल्या नऊजणांपैकी एकजण हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रशीद मलबारीचा मुलगा असल्याचे उघड झाले आहे. अन्नपदार्थ किंवा पाण्यातून विषारी पदार्थ देऊन एखाद्या कार्यक्रमात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट त्यांनी रचला होता.

सोमवारी मध्यरात्रीनंतर मुंब्रा आणि औरंगाबाद परिसरातील संशयितांच्या घरावर मारलेल्या छापेमारीत एटीएसने या ९ जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे असून विषारी रसायनं आणि हत्यारांसह ६ पेन ड्राईव्ह, २४ मोबाइल, ६ लॅपटॉप, ६ वायफाय पॉड्स, २४ डीव्हीडी आणि सीडी, १२ हार्ड डिस्क आणि ६ हून अधिक मेमरी कार्ड सापडले. तर हे  सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते. त्यासाठी त्यांनी “उम्मते -ए – मोहमदिया अल्लाह के अवाम” नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्व संशयितांची कसून चौकशी केले जात असल्याचे एटीएसचे पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. संशयितांपैकी दोघे अभियंता आणि एकाने फार्मसीचे शिक्षण घेतले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबाद येथील शाखेच्या संपर्कात असलेल्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील शाखा सलमान नावाचा तरूण शाखा चालवत होता. त्यात मुंब्रा येथील तीन तरूण होते. ते सलमानच्या संपर्कात होते. मोहम्मद मझहर शेख, मोहसीन खान, फहाद शाह या तिघांना ठाणे एटीएसने ताब्यात घेतले असून तिन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत. मोहम्मद मजहर शेख याच्या घरातून सोमवारी रात्री ३ वाजता छापा टाकला. त्याच्या घरातून सर्व मोबाइल, कागदपत्र, लॅपटॉप ताब्यात घेतले. हे तिघे तरूण संबंधित संस्थेत जाऊन शिक्षा घेत असल्याचा एटीएसला संशय आहे.