18 February 2019

News Flash

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीचे रासायनिक विघटन

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संशोधनातून साकारलेला हा प्रयोग प्रथमच मुंबईत यावर्षी होत आहे.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीच्या विघटनासाठी उभारलेला तलाव.

प्रभादेवी, वरळी येथे उभारलेल्या तलावांत १०० हून अधिक गणेशमूर्तीचे विसर्जन

प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटन करणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी शुक्रवारी चांगला प्रतिसाद दिला. मूर्तीचे विघटन करण्यासाठी प्रभादेवी आणि वरळी येथे उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये शुक्रवारी सुमारे १०० दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संशोधनातून साकारलेला हा प्रयोग प्रथमच मुंबईत यावर्षी होत आहे.

पाणी आणि बेकरीत वापरला जाणारा सोडा (अमोनिअम बाय काबरेनेट) याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे सुमारे ४८ तासांमध्ये विघटन होऊन तयार झालेले पाणी हे रासायनिक खत असते. संशोधन पुण्यातील कमिन्स इंडिया लिमिटेड आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने हे तंत्र विकसित केले आहे. अशा रीतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन करण्याचा अभिनव प्रयोग गेली तीन वर्षे पुण्यामध्ये यशस्वीरीत्या केला जात आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांना या प्रयोगाबाबत समजल्यानंतर त्यांनी रीतसर याची माहिती घेऊन हा प्रयोग मुंबईमध्ये राबविण्यात यावा, अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडे केली.

पाणी आणि अमोनिअन बाय काबरेनेटच्या मिश्रणाला जलाभिषेक असे नाव देण्यात आले आहे. या जलाभिषेकामध्ये मूर्ती बुडविल्यानंतर दर दोन-तीन तासांनी हे मिश्रण ढवळावे. प्लास्टिक स्वरूपातील रंगांचा वापर केला असल्यास त्याचा थर पाण्यावर तरंगतो. हा थर काढून टाकता येतो. मूर्तीचे विघटन झाल्यानंतर सुमारे १० टक्के गाळ तळाशी उरतो आणि स्थिर झालेले पाणी हे अमोनिअम सल्फेट म्हणजेच रासायनिक खत असते. हे पाणी थेट झाडांसाठी वापरता येते, असे एनसीएलच्या वरिष्ठ संशोधक डॉ. शुभांगी उंबरकर यांनी सांगितले.

मुंबईमध्ये वरळी येथील जांबोरी मैदान आणि प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली येथे जलभिषेक तयार केलेले कृत्रिम तलाव उभारले आहेत. जलाभिषेक तयार करण्यासाठी प्रत्यक्ष एनसीएलच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन देखील केले. यासाठी पालिकेने सुमारे १५ टन अमोनिअम बाय काबरेनेटची खरेदी केली आहे. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी, शुक्रवारी सुमारे १०० गणेशमूर्तीचे या तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले, तर या परिसरातील इतर कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तीदेखील रासायनिक तलावांत सोडण्यात येणार असल्याचे जी दक्षिण विभागाचे देवेंद्रकुमार जैन यांनी सांगितले. भाविकांनी भरघोस प्रतिसाद देऊन येथे विसर्जन केले. पाच दिवसांचे गणपती आणि अनंत चतुर्दशी या दिवशीही विसर्जनासाठी हे तलाव उपलब्ध असणार आहेत.

नागरिकांना आवाहन

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने केलेले संशोधन मुंबई महानगरपालिकेने राबवावे, यासाठी आम्ही पालिकेकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करून पालिकेने हा प्रयोग प्रत्यक्षात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तेव्हा नागरिकांनीही आता एक पाऊल पुढे येऊन या तलावांत मूर्तीचे विसर्जन करावे,’ असे आवाहन मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले.

First Published on September 15, 2018 4:35 am

Web Title: chemical disintegration of the statue of plaster of paris