कोरडय़ा रंगांनी होळी साजरी करा, पाण्याने भरलेले फुगे मारू नका, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नका.. या व अशा अनेक आवाहनांना हरताळ फासत मुंबई व परिसरात शुक्रवारी रंगोत्सव साजरा झाला. कांदिवलीतील चारकोप भागात रसायनमिश्रित पाण्याने भरलेला फुगा मारल्याने एक अल्पवयीन मुलगी जखमी झाली. तर वाहतूक पोलिसांनी तब्बल १४ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली.
मुंबई व परिसरात होलिकोत्सव उत्साहात साजरा झाला तरी फुगे मारण्याच्या घटनांनी रंगाचा बेरंग झाला. कांदिवलीतील रेणुकानगर परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीत राहणाऱ्या अक्षता कोकळे (१४) या मुलीवर रसायनमिश्रित पाण्याने भरलेला फुगा मारून फेकण्यात आला. अक्षताच्या चेहऱ्यावर जळजळू लागले. तिला उपचारासाठी त्वरित शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. अक्षताचा चेहरा डोक्यापर्यंत भाजला असून डोळ्याला इजा झालेली नाही. अक्षताला फुगा मारणाऱ्यांत तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासून या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्यांनी केवळ गुलाल असलेल्या पाण्याचा फुगा मारल्याचे पोलिसांना सांगितले. फुग्यात अ‍ॅसिडमिश्रित पाणी होते की पेट्रोल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फुग्यात काय होते, हे स्पष्ट झाल्यानंतरच कारवाई केली जाईल असे चारकोप पोलिसांनी सांगितले.
तळीरामांवर कारवाई
होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी बेशिस्त वाहनचालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली होती. या दोन दिवसांत पोलिसांनी तब्बल १४ हजार वाहनचालकांवर कारवाई केली, तर ४०९ तळीरामांवर कारवाई करून दंड आकारला. मद्यपान करून वाहन चालविल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी खास मोहीम होळीच्या दिवशी सुरू करण्यात आली होती. हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालविणाऱ्या ५ हजार ११४, एकाच मोटारसायकलीवरून तीनजण प्रवास करणाऱ्या २५३ जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. जागोजागी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद मंडय़ा यांनी दिली.
चार जण बचावले
होळीचा आनंद साजरा करायला मालाडच्या अक्सा समुद्रात गेलेल्या चौघांना बुडताना जीवरक्षकांनी शुक्रवारी  वाचवले. त्यात दोन तरुणींचा समावेश आहे. अंधेरीच्या पूनमनगरातील एमएमआरडीए कॉलनीत राहणाऱ्या सहा तरुण-तरुणींचा एक गट फिरण्यासाठी मालाडच्या अक्सा समुद्र किनाऱ्यावर आले होते. दुपारी त्यातील चौघे जण पाण्यात उतरले. परंतु समुद्राच्या लाटांमुळे ते आत फेकले गेले. हा प्रकार त्यांच्या दोन मित्रांनी पाहिला आणि मदतीसाठी धावा केला. सुरक्षेसाठी तैनात असलेले जीवरक्षक रजनीकांत माशेलकर आणि त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी चौघांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.