मुंबई :  निर्बंध शिथिल करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीची आज, सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार त्यात अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली, तरीही औषधांची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.

मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. या टप्प्याकरिता लागू करण्यात आलेले सर्व नियम पालिका प्रशासनाने स्वीकारले आहेत. त्यानुसार मुंबईत सर्व दुकाने व आस्थापने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू  ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. तर पालिकेने यात सुधारणा करून औषध विक्रीची दुकाने  सर्व दिवस २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

समित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याची मागणी

नव्या नियमांनुसार स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या बैठका ५० टक्के उपस्थितीत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व बैठका सध्या दूरचित्र संवाद माध्यमातून होत आहेत. त्यामुळे या सर्व बैठका प्रत्यक्ष घेण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षांचे सदस्य करू लागले आहेत.