वय वष्रे २४, तरीही चौसष्ट घरांची राणी असणारी बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन येत्या सोमवारी व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून लोकसत्ताच्या व्यासपीठावर येत आहे.. जग जिंकण्याची असीम महत्त्वाकांक्षा तिनेही जोपासली आहे.. चेहऱ्यावर वावरणारे नावाला साजेसे सौम्य स्मित तिचा आशावादी दृष्टिकोन स्पष्ट करते.. पुण्यातील सौम्या ही तशी सर्वानाच परिचित. सौम्याची कारकीर्द विशीतच घडायला लागली. २००८मध्ये तिने महिला ग्रँडमास्टर हा मानाच किताब जिंकला. त्यानंतर २००९मध्ये तिने ज्युनिअर गटात जगज्जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर तिची घोडदौड अविरत सुरू आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. सौम्याला बुद्धिबळाच्या प्रांतातील अनेक एव्हरेस्ट पादाक्रांत करायचे आहेत. आता जागतिक प्रतिष्ठेचा ग्रँडमास्टर हा किताब तिला साद घालतोय. जागतिक विश्वविजेता विश्वनाथ आनंद हे भारतातील बुद्धिबळपटूंचे प्रेरणास्थान. त्याने जागतिक स्तरावर एकेक यशोगाथाला रचायला प्रारंभ केल्यापासून देशात बुद्धिबळाचे वातावरण घडायला लागले. महाराष्ट्रातसुद्धा प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, स्वाती घाटे यांची परंपरा आज असंख्य ताज्या दमाचे युवा बुद्धिबळपटू चालवत आहेत.
यापैकीच एक म्हणजे सौम्या स्वामिनाथन. ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर सोमवारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सौम्याशी संवाद साधणार आहे.
या मुलाखतीत सौम्याचा आजवरचा प्रवास, भविष्यातील वाटचाल याचप्रमाणे तिच्या बहरणाऱ्या कारकीर्दीचा वेध घेतला जाणार आहे.

कधी, कुठे?
दिनांक : २२ एप्रिल, २०१३, वेळ : दु. ३.३० वा.
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
२५२, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.)