दादर रेल्वे स्थानकाबाहेर दोन मिनिटांच्या अंतरावर असलेली छबिलदास शाळा म्हणजे वर्षांनुवर्षे बाहेरच्याच रस्त्यावर पथाऱ्या पसरून बसलेल्या फेरीवाल्यांच्या सामानाची गाठोडी सांभाळणारे गोदाम म्हणूनही परिचयाची आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार अजित वाडेकर, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, अभिनेते दिलीप प्रभावळकर, विधानसभेचे माजी सभापती शरद दिघे, साहित्यिक व. पु. काळे, श्री. ना. पेंडसे, राम प्रधान यांच्याबरोबरच अनंत नामजोशी, सदानंद वर्दे, सुधीर जोशी हे माजी शिक्षणमंत्री छबिलदासचे विद्यार्थी. आताही या शाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत.
याशिवाय येथे कन्याशाळेचे तीन वर्ग चालतात. वर्गात शिकणारी बहुतांश मुले ही गरीब किंवा निम्न आर्थिक वर्गातील आहेत. पण, शाळेचा परिसर जणू ‘आओ जाओ घर तुम्हारा’ बनला आहे.
या शाळेतील वर्ग सायंकाळच्या सुमारास विविध कार्यशाळा व कार्यक्रमांना भाडय़ाने दिले जातात. त्यामुळे, सायंकाळी येथे बाहेरील व्यक्तींचा वावर वाढतो. त्याचबरोबर शाळांमधील वर्ग फेरीवाल्यांकरिता हक्काचे गोदाम मानले जातात.
त्यांच्या सामानाच्या गोणी रात्रीच्या वेळी शाळेच्या वर्गात पाहायला मिळतात, अशी तक्रार दादरमध्येच राहणाऱ्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यांने केली. महापालिकेची कारवाई सुरू झाली की फेरीवाले पहिल्यांदा शाळेचा आसरा घेतात. शाळेतील काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमुळेच हा प्रकार वर्षांनुवर्षे येथे सुरू असल्याची तक्रार या विद्यार्थ्यांने केली.
शाळेचा परिसर विद्यार्थ्यांकरिता सुरक्षित असावा या दृष्टीने कधी विचारच न झाल्याने हे गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरू आहे. शाळेचे पालकही गरीब व अशिक्षित असल्याने त्यांचा आवाज कुणी ऐकत नाही, अशी तक्रार माजी विद्यार्थी करत आहेत.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सतीश इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप धुडकावून लावले. मी जुलै, २०१५ मध्ये मुख्याध्यापकपदाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून तरी या गोष्टी शाळेत होत नसल्याचा दावा सतीश इनामदार यांनी केला आहे.
शाळेला दोन प्रवेशद्वारे आहेत. पण, तिथे सुरक्षारक्षक अभावानेच आढळतो. रात्रीच्या वेळीही शाळेचे प्रवेशद्वार खुले असते.
त्यातच शाळेतून फेरीवाल्यांना वीजपुरवठाही केल्याची तक्रार एका शिक्षकाने केली. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा निवडताना ती आपल्या पाल्याला भविष्यातील आव्हानांकरिता तयार करेल की नाही याचबरोबर ती आपल्या मुलाकरिता किती सुरक्षित आहे, याची खातरजमाही आता पालकांना करावी लागणार आहे.