सक्तवसुली संचालनालयाकडून आणखी एक गुन्हा नोंद

आपल्याला विनाकारण अडकविण्यात आल्याचा दावा करीत सुटलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भुजबळ यांच्यासह पुत्र पंकज व पुतणे समीर तसेच अन्य २५ जणांना बुधवारी विशेष न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने नवा गुन्हा दाखल करून घेतल्यास भुजबळ व इतरांना पुन्हा नव्याने जामीनासाठी अर्ज करावा लागेल. हा नवा गुन्हा म्हणजे पूर्वीच्या प्रकरणाचा एक भाग असल्याचे संचालनालयाच्या तक्रारीवरून दिसून येत आहे.

अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मलबार हिल येथील हायमाऊंट अतिथीगृह तसेच अंधेरी येथे सरकारी निवासस्थाने आणि टेस्टिंग ट्रॅक आदी बांधकामे १०० कोटींच्या मोबदल्यात बांधून देऊन अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड विकासकाला खुल्या विक्रीच्या घरांसाठी मिळणार होता. या प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशी सांगड घालण्यात आली होती. परंतु या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली  संचालनालयाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना अटक झाली. या दोघांची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या घोटाळ्यात भुजबळ आणि कुटुंबीयांनी  तब्बल ८६० कोटी कमावल्याचा आरोप आहे. त्यापैकी २९१ कोटींची मालमत्ता संचालनालयाला ताब्यात घेता आली आहे. त्यानंतर आणखी २५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली होती. या प्रकरणात भुजबळ व इतरांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बुधवारी (२७ जून) भुजबळ व इतरांना विशेष न्यायालयापुढे हजर राहण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. हा गुन्हा असल्यामुळे भुजबळ व इतरांना जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. मात्र विशेष न्यायालयात या प्रकरणी काय सुनावणी होते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागही सक्रिय होणार?

सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल केल्यामुळे भुजबळ अडचणीत आले आहेत. भुजबळांना आणखी कोंडीत पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्य़ांबाबत तपास सुरू करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. भुजबळांनी आपण निर्दोष असल्याची प्रसिद्धी सुरू केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या या दोन्ही यंत्रणांनी आता पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत.