छगन भुजबळ तुरुंगात..

सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेली दीड वर्षे तुरुंगात असतानाच सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनील तटकरे या दोन माजी मंत्र्यांची मात्र अद्यापही चौकशीच सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील समझोत्यातून (फिक्सिंग) सारी चक्रे पडत असल्याची चर्चा आहे.

रायगड जिल्ह्य़ातील कोंढाणा प्रकल्प सिंचन घोटाळ्यात दोनच दिवसांपूर्वी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यात अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले असून, तटकरे यांची अद्याप चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकणातील अन्य एका प्रकल्पाच्या संदर्भात सादर झालेल्या आरोपपत्रात अजित पवार यांची चौकशी सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजेच अजितदादा आणि तटकरे या दोन तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांच्या विरोधात गेली अडीच वर्षे नुसतीच चौकशी सुरू आहे. ही चौकशी कधी पूर्ण होणार याचेही उत्तर नाही.

बांधकाम घोटाळ्यात छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्याच वेळी अजित पवार आणि तटकरे या दोन नेत्यांच्या विरोधात भाजप सरकारने अस्ते कदम भूमिका घेतली आहे. भाजप नेत्यांनी मनात आणल्यास अजितदादा किंवा तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते. पण सारे जर, तरवर अवलंबून आहे.