तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी सभागृहाचा वापर केला जाऊ नये, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य सरकार कोणाचेही घोटाळे दाबण्यासाठी मदत करणार नाही, असे स्पष्ट केले. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईला विरोधकांनी राजकीय म्हटले, तरी जनतेला काय राजकीय आहे, हे समजते, असाही टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
छगन भुजबळ यांच्या अटकेच्या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला स्थगन प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी फेटाळला. अध्यक्षांनी सांगितल्यानुसार फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राजकीय हेतूने सरकारने भुजबळांवर कारवाई केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केला. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले. या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेमध्ये उमटले. जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून या विषयावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही त्याला अनुमोदन दिले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने सुरुवातीला कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले.
विधानभवनाच्या आवारात प्रवेश केल्यापासूनच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘फुले, शाहू आंबडेकरांच्या विचारांवर घाला घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘आयेगी आयेगी हमारी बारी आयेगी’ अशा घोषणा विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर देण्यात येत होत्या. सभागृहात जयंत पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांना न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले असते, तर आम्ही समजू शकलो असतो. पण तपास करणाऱ्या यंत्रणांना सर्व सहकार्य करूनही छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला. हा सभागृहाच्या सदस्यावर झालेला हल्लाच आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून या विषयावर चर्चा घेण्यात यावी. विखे-पाटील यांनीही या घटनेचा निषेध करीत राज्य सरकारच या कारवाईला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला.
विरोधकांच्या हल्ल्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी या कारवाईचे समर्थन करीत शासकीय पैशाचा भ्रष्टाचार केल्यामुळे भुजबळांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा कामकाज तहकूब करण्यात आले.