सॉलिटेअर इमारतीच्या मूळ मालकाचा फसवणूकप्रकरणी जबाब
काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये सध्या अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या सांताक्रूझ पश्चिम येथील सॉलिटेअर इमारतीवर सक्तवसुली महासंचालनालयाने टाच आणल्यानंतर ही इमारत ज्या भूखंडावर उभी आहे त्या मूळ भूखंड मालकाला फसविल्याप्रकरणीही जबाब नोंदविण्यात आला आहे.
सॉलिटेअर इमारत समीर व पंकज भुजबळ संचालक असलेल्या मे. परवेश कन्स्ट्रक्शनने सांताक्रूझ पश्चिमेला नऊ मजली सॉलिटेअर इमारत उभारली. या इमारतीच्या भूखंडावर याआधी ला पेटिट फ्लुअर हा बंगला होता. हा बंगला सुरुवातीला रहेजा समूहाच्या मे. पाम शेल्टर कंपनीने विकत घेतला होता. त्यानंतर त्याची मालकी मे. परवेश कन्स्ट्रक्शनकडे आली. नऊ मजली आलिशान इमारतीत २५०० चौरस फुटांचा पाचवा, सातवा व आठवा मजला भुजबळ कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. समीर, पंकज आणि मीना भुजबळ यांच्या नावे त्याची नोंद असल्याचे कळते. मूळ बंगलामालकाचे मुखत्यारपत्रधारक असलेल्या क्लॉड व डॉरेन फर्नाडिस या वृद्ध दाम्पत्याला जबाब नोंदविण्यासाठी महासंचालनालयाने बोलविले होते. या जबानीचा भुजबळांविरुद्ध वापर केला जाऊ शकत असल्यामुळे ते आणखी अडचणीत येतील, असे सूत्रांनी सांगितले.
बॉम्बे कॅथलिक सोसायटीने १९३४ मध्ये फ्रान्सिस फर्नाडिस यांना सुमारे ९५१ चौरस फुटांचा भूखंड दिला. या जागेवर त्यांनी बंगला बांधला. १९९५ मध्ये हा बंगला पाडून इमारत बांधण्यासाठी रहेजा समूहाच्या पाम शेल्टर कंपनीसोबत करार झाला. या जागी बहुमजली इमारत बांधून त्यात ७२० चौरस फुटांच्या पाच सदनिका दिल्या जाणार होत्या; परंतु दहा वर्षे काहीच झाले नाही. २००५ मध्ये अचानक हा बंगला पाडण्यास घेतला गेला. त्यामुळे चौकशी केली तेव्हा परवेश कन्स्ट्रक्शन हे काम करीत असल्याचे सांगण्यात आले. या कंपनीच्या मालकांविषयी काहीही कल्पना नव्हती. बॉम्बे कॅथलिक सोसायटीकडे चौकशी केली तेव्हा परवेश कन्स्ट्रक्शन ही समीर व पंकज भुजबळ यांची कंपनी असल्याचे समजले. रहेजा समूहाच्या कंपनीनेबंगल्याचे हक्क परवेश कंपनीला हस्तांतरित केल्याचे करारपत्र त्यांना देण्यात आले. या करारपत्रात फर्नाडिस दाम्पत्याच्या सह्य़ा नसतानाही हे करारपत्र नोंदले गेले.

आम्हाला आमच्या हक्काच्या सदनिका हव्या आहेत. कोटय़वधी रुपयांची आमची जागाही गेली. किमान सदनिका मिळाव्यात. पोलिसांनी कधीही तक्रार घेतली नाही. मात्र, सक्तवसुली महासंचालनालयाने आम्हाला दोन वेळा जबानीसाठी बोलाविले. आम्ही वस्तुस्थिती कथन करून कागदपत्रेही जोडली आहेत. आता न्याय मिळेल असे वाटते.
– क्लॉड फर्नाडिस