राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना जे. जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भुजबळांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोडच्या तुरुंगात करण्यात आलेली आहे. भुजबळांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले जाणार का, याबद्दलचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.

छगन भुजबळ यांना लवकरच उपचारांसाठी जे. जे. रूग्णालयातून अन्यत्र हलविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा जे.जे. रूग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे भुजबळांना अद्ययावत सुविधा असलेल्या रूग्णालयात हलविण्याची गरज असल्याचे जे.जे. रूग्णालयाकडून तुरुंग प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, तुरुंग प्रशासनाने अशा प्रकारचा कोणताही पत्रव्यवहार झाल्याचा दावा फेटाळला होता.

भुजबळांना प्रचंड ताप आणि अंग दुखीचा त्रास होत असल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मदतीशिवाय भुजबळांना चालता देखील येत नव्हते. भुजबळ यांना १५ सप्टेंबरपासून ताप होता. शिवाय त्यांच्या प्लेटलेट्सदेखील कमी झाल्या आहेत. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. यापूर्वी एप्रिलमध्ये भुजबळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भुजबळ यांना दमा, अतिताण आणि रक्तदाबाचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या छगन भुजबळ आर्थर रोड तुरुंगात आहेत.