सांताक्रूझ, कालिना येथील राज्य ग्रंथालय भूखंड ‘इंडिया बुल्स’ला आंदण देणे तसेच नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासातील गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी चौकशीसाठी पुन्हा पाचारण करण्यात आले. सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाचे सुमारे २९०० कोटी रुपयांचे कंत्राट तिघा विकासकांना देताना सुमारे ३४ कोटींची लाच भुजबळ आणि कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना मिळाल्याचा प्रमुख आरोप आहे. या आरोपात तथ्य आढळत असून या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी भुजबळ यांची चौकशी सुरू  असून राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यास दुजोरा दिला. मात्र अधिक माहिती सांगण्यास नकार दिला.
सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच रद्द केले होते. मात्र हे कंत्राट डी. बी. रिअ‍ॅलिटी, काकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकृती बिल्डर्स (आताचे हबटाऊन) यांना देताना ३४ कोटींची लाच दिल्याचा आरोप उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत करण्यात आला होता. या अनुषंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे. याही प्रकरणात संबंधित कंपन्यांनी थेट तसेच उपकंपन्यांमार्फत लाच दिल्याचे थेट पुरावेच आहेत. त्या अनुषंगाने सध्या भुजबळ यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक प्रश्नांना भुजबळ समाधानकारक उत्तरे देऊ शकलेले नाहीत, असेही ‘एसीबी’तील सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी समीर तसेच पंकज भुजबळ यांनाही पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. सकृद्दर्शनी गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावे असल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.
सरकारी वसाहतीच्या एच, आय आणि जे ब्लॉकच्या पुनर्विकासाचे अनुक्रमे ८८५.१०, ३५९.७७ आणि १६६२.१४ कोटी रुपयांचे कंत्राट मे. डी. बी. रिअ‍ॅलिटी, काकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकृती बिल्डर्सला देण्यात आले होते. याशिवाय आकृती बिल्डर्सला अंधेरीतील मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहती (२५४.७९ कोटी) आणि घाटकोपर प्रादेशिक परिवहन विभागाचा भूखंड (५७१.०२ कोटी) आदींच्या मोबदल्यात ३४ कोटींची लाच मिळाली होती. या रकमेतून शिवयश डेव्हलपर्स आणि ब्ल्यू सर्कल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांमार्फत खारघर येथे हेक्स वर्ल्ड या आलिशान घरांच्या प्रकल्पासाठी भूखंड खरेदी केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. ही लाच समीर व पंकज भुजबळ संचालक असलेल्या परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत देविशा इन्फ्रास्ट्रक्टर या कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आली आणि या कंपनीने खारघर येथे हेक्स वर्ल्ड या प्रकल्पासाठी भूखंड खरेदी केला, असा आरोप याचिकेत केला आहे.