माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच सक्तवसुली महासंचालनालयाने आरोपपत्र दाखल केल्यामुळे या आरोपपत्राचा आधार घेतच एसीबीकडून बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात एसीबीने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर महासंचालनालयानेही स्वतंत्र गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला होता. या तपासात या घोटाळ्यातून भुजबळ आणि कुटुंबीयांनी ८७० कोटी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा आरोप ठेवला होता. भुजबळांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यासाठी सादर केलेल्या रिमांड अर्जात ८४० कोटींचा उल्लेख केला आहे. यापैकी आतापर्यंत १३१.८६ कोटींच्या मालमत्तेवर आतापर्यंत टाच आणण्यात आली आहे. अद्याप ७०८ कोटींच्या मालमत्तेचा शोध घ्यायचा आहे, असेही त्यात म्हटले आहे. या आरोपपत्राचा फायदा घेतच एसीबीमार्फत आता बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. सक्तवसुली महासंचालनालयाने नोंदविलेला जबाब हा न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येतो, असेही एसीबीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतरही भुजबळ आणि इतरांना अटक न करण्यामागे महासंचालनालयाच्या कारवाईची वाट पाहिली जात होती. एसीबीने नोंदविलेला जबाब न्यायालयात बऱ्याचवेळा अमान्य होतो. मात्र ती बाब महासंचालनालयाच्या तपासाबाबत लागू होत नाही. त्यामुळे भुजबळ प्रकरणातील प्रत्येक तपासातील जबाबाचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. तब्बल ५२ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे. त्यापैकी सरकारी अधिकाऱ्यांच्या बेहिशेही मालमत्तेप्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यताही या सूत्रांनी वर्तविली.