तुरुंगात असताना वेळ घालवण्यासाठी वाचनाचा एक पर्याय होता. तुरुंगात वेगवेगळया विषयांवरील पुस्तके, वर्तमानपत्रे वाचायचो. आयुष्यात केलं नाही इतक वाचन मी तुरुंगात असताना केलं असे जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. रोज वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचत असल्यामुळे बाहेर काय चाललयं ते वर्तमानपत्रांमधून समजत होते.

दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या पद्मावत चित्रपटाचा संपूर्ण वाद वर्तमानपत्रांमुळे समजला असे छगन भुजबळ यांनी सांगितले. जेलमध्ये फक्त दूरदर्शन पाहायला मिळायचे. डीडीचे एकच चॅनल लागायचे. तुरुंगातल्या बराकीतून समोरच्या टीव्हीवर जे लागलेले असायचे ते पाहत बसायचो. एकही नवीन सिनेमा पाहता आला नाही पण काही जुने सिनेमे पाहता आले असे तुरुंगातील अनुभव सांगताना भुजबळ म्हणाले.

जेलमध्ये पीटर मुखर्जी सोबत होता. पीटर मुखर्जीला शीना बोरा हत्या प्रकरणात अटक झाली आहे. जे जेल मी बांधलं त्यामध्ये अडकण्याची वेळ माझ्यावर आली असे भुजबळ यांनी सांगितले. मला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले. जवळपास दोन वर्ष महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात तुरूंगात असलेले भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले असून खटल्याच्या सुनावणीमध्ये खरं काय ते बाहेर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

अपने खिलाफ बातों को अक्सर मैं ख़ामोशी से सुनता हूँ
क्योकि जवाब देने का हक़.. मैंने वक़्त को दे रखा है :

कार्यक्रमाच्या शेवटी भुजबळांनी हा शेर ऐकवला व योग्यवेळी विरोधकांना उत्तर देणार असल्याचे सूचित केले.