दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर मी फक्त स्वाक्षरी केली. ही फाईल आधीच्या सरकारच्या काळातील होती. त्यांच्या अटकेसाठी आपण कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. ही फाईल माझ्यासमोर आली तेव्हा गृहमंत्री म्हणून मी फक्त त्यावर स्वाक्षरी केली असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी केला. एका खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९९ साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. त्याआधी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते. म्हणजे भुजबळांनी त्यांच्या वक्तव्यातून बाळासाहेबांच्या अटकेच्या कारवाईसाठी शिवसेना-भाजपा युती सरकारकडे बोट दाखवले आहे. ही फाईल कोणी तयार केली ? त्यामागे कोण होते? त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही असे त्यांनी सांगितले. या फाईलवर स्वाक्षरी करताना तुम्हाला आनंद झाला कि, दु:ख या प्रश्नावर त्यांनी आपल्याला माहिती नाही असे उत्तर दिले.

खरंतर शिवसेनाप्रमुखांना जेव्हा अटक झाली तेव्हा शिवसेना आणि भुजबळांमध्ये आजच्यासारखे सख्य नव्हते. तेव्हा सातत्याने शिवसेनेकडून भुजबळांवर बोचरी टीका केली जायची. त्यामुळे बाळासाहेबांच्या अटकेमागे भुजबळच असल्याचे अनेकांचे मत होते.

काय होते प्रकरण
मुंबईत १९९२-९३ साली झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या श्रीकृष्ण आयोगाने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानुसार २००० साली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. २४ जुलै २००० साली बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांची सुटका झाली.

सामनामध्ये चिथावणीखोर लेखन केल्या प्रकरणी बाळासाहेबांना कलम १५३ (अ) अंतर्गत अटक करण्यात आली होती. बाळासाहेबांबरोबर सामनाचे प्रकाशक सुभाष देसाई आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. पण या सर्वांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली. बाळासाहेबांना अटक होणार म्हणून त्यावेळी मुंबईत प्रचंड तणाव होता. शिवसेना प्रमुखांना अटक झाल्याचे समजताच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात दुकाने बंद करण्यात आली होती. शाळा सोडून देण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal ncp shivsena supremo balasaheb thackeray
First published on: 13-06-2018 at 21:51 IST