25 November 2017

News Flash

पंकज यांच्यावर धमकावल्याचा आरोप

भुजबळांविरोधात माफीच्या साक्षीदारांची तक्रार

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 19, 2017 1:53 AM

pankaj bhujbal

भुजबळांविरोधात माफीच्या साक्षीदारांची तक्रार

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तुरुंगात असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयातच मंत्रालयासारखा दरबार सुरू केल्याची गंभीर तक्रार याच प्रकरणात सहआरोपी असलेल्या आणि आता माफीचा साक्षीदार बनलेल्या दोघांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आरोप करीत भुजबळांच्या न्यायालयातील दादागिरीकडे लक्ष वेधले होते. परंतु भुजबळ यांनी खुलासा करून या आरोपांचे खंडन केले होते. परंतु आता तसाच आरोप झाल्याने भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सक्तवसुली महासंचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्य़ात अमित बलराज आणि सुधीर साळसकर हे सहआरोपी होते. मात्र त्यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार १६ मे रोजी विशेष न्यायालयात (न्यायालय क्रमांक १६) त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार हे दोघेही न्यायालयात आले. परंतु न्यायाधीश नव्हते. त्यामुळे हजेरी लावण्यासाठी न्यायालयातील कारकुनाकडे गेले आणि सुनावणी कधी होईल याची त्यांनी माहिती घेतली. परंतु आपण जेव्हा न्यायालयात प्रवेश केला तेव्हा तेथे छगन भुजबळ, समीर व पंकज होते. याशिवाय सर्वत्र भुजबळांचे कार्यकर्ते होते. न्यायालयाला मंत्रालयातील जनता दरबाराचे स्वरुप आले होते. सकाळी ११ ते दोन वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता, अशी गंभीर तक्रार या दोघांनी कुलाबा पोलीस ठाण्यात केली आहे.

आपण कोर्ट कारकुनाकडे हजेरी लावून वकीलांची वाट पाहण्यासाठी बाहेर आलो. आपल्यापाठोपाठ पंकज धावतच आले आणि ते आपल्याला धमकावू लागले. तुम्ही कोणाची वाट पाहत आहात. तुमचे काम झाले ना आता निघून जा, असे पंकज सांगत होते. माफीचा साक्षीदार म्हणून आमचा जबाब नोंदला जाणार आहे. आम्ही वकीलांची वाट पाहत आहोत, असे सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पंकज भुजबळ यांनी, न्यायालयातून निघून गेला नाहीत तर परिणाम वाईट होईल, असे धमकावल्याचे बलराज आणि साळसकर यांचे म्हणणे आहे.

पंकज भुजबळ हे सध्या जामिनावर आहेत. परंतु त्यांचे असे वागणे म्हणजे आमच्या जिवाला धोका आहे. ते काहीही करू शकतील, अशा स्थितीत होते, असे या तक्रारदारांचे म्हणणे आहे. हा प्रकार न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून तपासून पाहता येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पंकज भुजबळ यांना अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र कुलाबा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून या तक्रारींची नोंद केली आहे. दरम्यान, भुजबळ यांनी अंजली दमानिया यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठविली आहे.

 

First Published on May 19, 2017 1:53 am

Web Title: chhagan bhujbal pankaj bhujbal black money