राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत तर्कवितर्क सुरू असताना भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह नाशिकमधील शिवसैनिकांना त्रास दिल्याची जाणीव आहे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांच्या बैठकीत गेल्याने भुजबळांच्या सेना प्रवेशाबाबतचे गूढ वाढले आहे.

छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह नाशिकमधील नेते-पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांच्याबाबत या नेत्यांचे मत ऐकून घेतले. शिवसेना फोडून बाळासाहेब ठाकरे यांना यातना देणारे व नंतर सत्ता आल्यावर बाळासाहेबांना अटक करण्यात भुजबळ यांची भूमिका होती. नाशिकमधील शिवसैनिकांनाही भुजबळांनी त्रास दिल्याचे नाशिकच्या नेत्यांनी सांगितले.

त्यावर या गोष्टींची मलाही जाणीव आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याचे बबनराव घोलप यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे आता उद्धव यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, भुजबळ यांच्या प्रवेशावर फुली मारली की अजूनही विचार होईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.