पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मित्रों..’ ही खास शैलीतील साद विधानसभेत घुमली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सरकारच्या आश्वासने आणि घोषणांची mu09पिसे काढताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या खाशा ढंगात असा काही निशाणा साधला की मुख्यमंत्र्यांनी पोट धरधरुन हसत प्रत्येक वेळी दाद दिलीच, तर भुजबळांच्या वाक्बांणांनी हैराण झालेल्या शिवसेना सदस्यांनी हरकतींवर हरकती घेतल्याने त्यांचे भाषण तब्बल दीड तास रंगले.
अतिशय क्लिष्ट आणि बोजड मराठी भाषा अभिभाषणात वापरली असल्याचे दाखले देत भुजबळ यांनी आपली फटकेबाजी सुरु केली. आपल्या शैलीतील हावभाव आणि भात्यातील तीर सोडत ‘अहो, वाक्यांचा नेमका अर्थ सांmu02गा, ’ असे प्रश्न करण्यास भुजबळ यांनी सुरुवात केल्यावर मुख्यमंत्र्यांसह सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून जात होते.
शिवसेना आणि भुजबळ यांचे ‘जुने प्रेमसंबंध’. त्यामुळे मुंबईचा विकास आराखडा ‘चुलीत टाका’, जैतापूर प्रकल्प गुजरातला न्या, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांचे दाखले देण्यास भुजबळ यांनी सुरुवात केल्यावर शिवसेना आमदार अस्वस्थ झाले. मुंबईतून मराठी माणसाची हद्दपारी, मंत्र्यांचे अधिकार आणि भाजप-शिवसेनेतील कुरबुरींचा उल्लेख त्यांनी केला. ठाकरे यांच्याविषयीचे टोमणे असह्य़ झाल्यावर माजी mu08महापौर सुनील प्रभू यांनी विकास आराखडय़ासंदर्भात खुलासा करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रारुप आराखडा असल्याचे सांगितले. त्यावर ‘अहो, ते मला कशाला सांगता, ते ठाकरे यांना सांगितले असते, तर चुलीत टाका म्हटले नसते,’ असा बिनतोड युक्तिवाद भुजबळ यांनी केल्यावर प्रभूही निरुत्तर होत हास्यकल्लोळात सामील झाले. अनेकदा हरकती घेऊनही शिवसेना-भाजप सदस्यांना भुजबळ यांचा भडिमार रोखता आला नाही.
राज्य सरकारची कामगिरी व धोरणे मांडणाऱ्या प्रत्येक मुद्दय़ांमधील खोड सांगत टोले लगावण्याची एकही संधी भुजबळ यांनी सोडली नाही आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उखळी तोफांचा भडिमार केला. भाजपमधील ज्येष्ठांना बाजूला सारुन अतिशय तरुणपणी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याने त्यांनी आपला प्रभाव दिल्लीदरबारी दाखवून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक निधी मिळवावा आणि कुंभमेळ्यासाठीही अनुदान पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. मंत्रमुग्ध करुन टाकणारी वक्तृत्वशैली, हजरजबाबीपणा आणि कसदार अभिनयकौशल्य याच्या जोरावर भुजबळ यांनी बुधवारी विधानसभा तब्बल दीड तास गाजवली.